
नुकतेच ‘एनटीआर’ बायोपिकमधून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. विद्या आता या पाठोपाठ तामिळ चित्रपटातही झळकणार आहे. २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस अनिरुद्ध रॉयद्वारा दिग्दर्शित ‘पिंक’ चित्रपट आला होता, ती याच चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्ये दिसणार आहे. पिंक हा एक सोशल ड्रामा चित्रपट होता.
विद्या बालन ‘पिंक’च्या तामिळ रिमेकमध्ये झळकणार
अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. याच चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्ये आता विद्या बालन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. अजित या तामिळ रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणार आहे. तर तापसी पन्नूच्या भूमिकते विद्या बालन दिसणार आहे.
या वृत्ताला चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी देखील दुजोरा दिला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जुलै महिन्यात सुरुवात होणार आहे. तर २०२० मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्या बालन या चित्रपटातून तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याने निश्चितच तिच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे.
