महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथींचा फडणवीस सरकारला पडला विसर!

devendra-fadanvis
मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार महापुरुषांची थोरवी गात सत्तेवर आले, पण आता त्यांच्याच पुण्यतिथीचा विसर फडणवीस सरकारला पडल्याचे दिसत आहे. कारण महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या तारखांचा उल्लेखच राज्य शासनातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेत नसल्याचे समोर आले आहे.

या दिनदर्शिकेचे राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून सर्व विभागांना वितरण करण्यात आले आहे. पण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच यात नाही. दिनदर्शिकेत 1 डिसेंबरला जागतिक एड्स प्रतिबंधक दिन, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंधक दिन आणि 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचा पण उल्लेख केला आहे.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याच्या महतीने पुरोगामी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते. या तीन महापुरुषांना सत्ताधारी असो वा विरोधक कधीही विसरत नाही. पण या तिघांची थोरवी गाऊन सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाणदिनाचा आणि 28 नोव्हेंबरच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 2019 या नववर्षाच्या दिनदर्शिकेत उल्लेखच नाही. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे वितरण मंत्रालयासह शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे.

Leave a Comment