
नवी दिल्ली – अवघे काही महिनेच लोकसभा निवडणुकांना उरलेले असून भाजपने यासाठी कंबर कसलेली दिसत आहे. भाजप अनुसूचित जातींचे मतदान मिळवण्यासाठी ६ जानेवारीला रामलीला मैदान येथे खिचडी बनवणार आहे. त्याचबरोबर या खिचडीच्या माध्यमातून जागतिक विक्रम बनवण्याचाही त्यांचा मानस आहे.
भाजप अनुसूचित जातींच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी बनवणार ५ हजार किलोची खिचडी
३ लाख पेक्षा जास्त अनुसूचित जातींच्या कुटूंबाकडून डाळ आणि तांदूळ भाजपने ही खिचडी तयार करण्यासाठी एकत्र केले आहे. ते यामधून ५ हजार किलोची खिचडी तयार करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रेरित होऊन हाती घेतला असल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.
समरसता खिचडी, असे या खिचडीला नाव देण्यात आले आहे. ही खिचडी जागतिक विक्रम बनवणार आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र करण्यासाठी २८ हजार कार्यकर्त्यांनी ३ लाख लोकांशी संपर्क केला. डाळ आणि तांदूळ एकत्र करताना कोणत्याही अनुसूचित जातींच्या व्यक्तींनी नकार दिला नाही, असा दावाही भाजपने केला आहे.
