वा रे तुमचे हिंदुत्व!- सामना

samna
मुंबई – सध्या शबरीमाला मंदिराचा वाद केरळमध्ये सुरू असून संघ आणि भाजप मंदिरासाठी आणि हिंदुत्त्व रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. पण ते अयोध्येतील राममंदिरप्रश्नी गप्प आहेत. शिवसेनेने या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे.

केरळात ‘संघ’ मंदिर व हिंदुत्व रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे, पण ते अयोध्येतील राममंदिरप्रश्नी थंड आहेत. ‘लोकभावना’ फेम अमित शहा मोदी यांच्या न्यायालयाच्या बतावणीवर बोलत नाहीत व सरसंघचालक पुढे जात नाहीत. राममंदिरास भाजपचे दोन मित्रपक्ष नितीशकुमार, रामविलास पासवान यांनी संपूर्ण विरोध केला आहे. तरीही त्यांच्यापुढे बिहारात भाजप नेतृत्वाने गुडघेच टेकले. राममंदिरासाठी बाजी लावणार्‍या शिवसेनेसमोर अहंकार व रामास विरोध करणार्‍यांपुढे शरणागती. वा रे हिंदुत्व! महिला शबरीमाला मंदिरात गेल्या तर बिघडते काय? असे आव्हान रामविलास पासवान यांनी अमित शहांनाच दिले. तरीही मृदंगाचा गजर सुरूच असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

राममंदिर काँग्रेस सत्तेवर होती म्हणून उभारता येत नव्हते, मोदी आता सत्तेवर आहेत आणि राममंदिर उभारता येत नसल्याचे खापर ते काँग्रेसवर फोडत आहेत. याचा दुसरा अर्थ असा की, तुम्हाला राज्य करणे जमले नाही आणि संघाला घोड्यास लगाम घालणे जमले नाही, असा टोला शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून लगावला आहे. सध्या जो खेळखंडोबा हिंदुत्वाच्या नावावर सुरू आहे तसा काँग्रेसच्या राजवटीतही झाला नव्हता. देशातील दोन प्रमुख मंदिरांवरून लोकभावना तीव्र आहेत. पहिले राममंदिर व दुसरे केरळचे शबरीमला मंदिर.

भाजप व संघ परिवाराची या दोन्ही मंदिरांबाबतची भूमिका स्वतंत्र म्हणजे मृदंग दोन्ही बाजूने वाजवण्यासारखी आहे. संघाने भाजपच्या मदतीने केरळमध्ये महिला मंदिर प्रवेशाचा मुद्दा पेटवला आहे. याप्रश्नी केरळमध्ये हिंसाचार भडकला आहे. संघाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून कायदा हातात घेत आहेत. गोळीबारात लोक मृत्युमुखी पडले आहेत. पत्रकार, पोलिसांवर हल्ले सुरू आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मंदिराचा प्रश्न न्यायालयातच सोडवू. म्हणजे अयोध्येतील राममंदिरासाठी न्यायालयाकडे बोट दाखवायचे, पण शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादाबाबत न्यायालयीन निर्णय झुगारून द्यायचा. असे हे मृदंगाच्या दोन्ही बाजू बडवणे सुरूच आहे. असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

Leave a Comment