लवकरच येणार पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक

anandibai-joshi
आजही मोठ्या आदराने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव घेतले जाते. आनंदीबाई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून शिकल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. आता त्यांच्या याच प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देशातील प्रत्येक महिलेला आनंदीबाई म्हणजे महाराष्ट्राने दिलेली देगणी असल्याचे म्हणत या चित्रपटाची झी स्टुडिओने घोषणा केली आहे. आनंदीबाईचा जीवनप्रवास १५ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीने परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री अशी त्यांची ख्याती होती. त्या आजही फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणून ओळखल्या जातात. ‘आनंदी गोपाळ’ यांच्यावर श्री. ज. जोशी यांनी कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित नाटकही रंगभूमीवर आले होते.

आनंदीबाईचे लग्न वयाच्या दहाव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी झाले. आनंदीबाईंना मी माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. आजींचा आनंदीबाईच्या शिक्षणात अडसर नको म्हणून गोपाळरावांनी कोल्हापूरमध्ये बदली करून घेतली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आले की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचे शिक्षण करावे. पण अपमानास्पद शेरे त्यांना शिकण्याच्या कार्यात झोकून देताना खूप ऐकावे लागले. पण आनंदी तिकडे दुर्लक्ष करून आपला अभ्यास निष्ठेने करीत राहिल्या. ‘आनंदी गोपाळ’ मध्ये त्यांचा हाच प्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका साकारणार कोण याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून आहे.

Leave a Comment