२०१८ सालामध्ये या अभिनेत्रींनी जिंकून घेतली प्रेक्षकांची मने

actress
२०१८ सालामध्ये अनेक यशस्वी चित्रपट आले. या चित्रपटांच्या माध्यामातून त्या चित्रपटांमध्ये भूमिका करीत असलेल्या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयकौशल्याची छाप प्रेक्षकांवर पाडत भरघोस प्रशंसा मिळविली. किंबहुना या चित्रपटांना मिळालेल्या भरघोस यशामध्ये या अभिनेत्रींचा वाटा खूप मोठा होता असे म्हणावयास काहीच हरकत नाही. ‘मुल्क’ चित्रपटामध्ये तापसी पन्नू हिने वकिलाची भूमिका साकारली आहे. अतिशय करारीपणे आपले मुद्दे मांडणारी वकील तापसीने या चित्रपटात उभी केली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे भरपूर कौतुक मिळाले. तर ‘परी’ या भयपटामध्ये अनुष्का शर्माने साकारलेली ‘रुखसाना’ प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवणारी ठरली.
actress1
भूमी पेडणेकर हिने झोया अख्तर दिग्दर्शित ‘लस्ट स्टोरीज’मधील एका कथेमध्ये, घरमालकाच्या प्रेमात पडणारी मोलकरीण साकारली आहे. या चित्रपटाला व्यावसायिक यश फारसे मिळाले नसले, तरी भूमीचा अभिनय मात्र वाखाणण्याजोगा आहे. अभिनेत्री नीना गुप्ता हिने ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांच्या नंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. वाढत्या वयामध्ये गर्भधारणा झालेल्या स्त्रीच्या भावना, इतरांचे टोमणे शांत पणाने सहन करीत, मनातल्या मनात कोसळत जाणारी ‘प्रियंवदा’ नीनाने फारच सुंदर साकारली आहे.
actress2
‘मंटो’ चित्रपटामध्ये सादत हसन मंटो या लेखकाच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये सादतच्या पत्नीची भूमिका रसिका दुग्गलने साकारली आहे. सर्व अडचणींना तोंड देत आपल्या पतीच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी ‘सादिया’ या चित्रपटामध्ये रसिकाने साकारली आहे. ‘लस्ट स्टोरीज’ या अनेक कथांचे संकलन असलेल्या चित्रपटामध्ये दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित कथेमध्ये मनीषा कोईरालाने आपल्या पतीच्या मित्राच्या प्रेमात पडलेली गृहिणी साकारली आहे. यंदाच्या वर्षी आलेल्या ‘अंधाधून’ चित्रपटामध्ये तबूने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. केवळ पैशासाठी लग्न करून आणि त्यानंतर स्वतःच्या पतीला संपविणारी ही नायिका आहे. आपला गुन्हा उघडकीला येऊ नये, यासाठी काय वाटले ते करण्यासाठी तयार असलेली ‘सिमी’ तबूने लाजवाब रंगविली आहे.

Leave a Comment