ब्रॉडब्रँड क्षेत्रात रिलायन्स जिओची एन्ट्री; सर्वात स्वस्त ब्रॉडबँड देणार


मुंबई: रिलायन्स जिओने मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रात धुमाकूळ केल्यानंतर आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याबद्दलची घोषणा केली. जिओ गिगा टीव्ही रिलायन्सकडून सुरू करण्यात येणार असल्यामुळे भारतीयांची टीव्ही पाहण्याची पद्धत बदलेल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला.

व्हाईस कमांड आणि रिमोटने जिओ गिगा टीव्ही चालेल. यासोबतच जिओ गिगा टीव्हीमध्ये कॉलिंगची सुविधादेखील उपलब्ध असेल. यामुळे एका जिओ गिगा टीव्हीवरुन दुसऱ्या जिओ टीव्हीवर फोन लावता येईल. याशिवाय जिओ गिगा टीव्हीवरुन मोबाईलवरही कॉल करता येईल. या टीव्हीला व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लावल्यास ३६० अंशातील व्ह्यू पाहता येईल.

मुकेश अंबानी यांनी जिओ गिगा टीव्हीसोबतच जिओ गिगा फायबरचीही घोषणा केली. रिलायन्स समूहाने या घोषणेसोबतच ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश केला आहे. सर्वात स्वस्त जिओची ब्रॉडब्रँड सेवा असेल, असे अंबानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्राप्रमाणेच ब्रॉडब्रँड क्षेत्रातही आता रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिओ गिगा राऊटर, गिगा टीव्ही सेटटॉप बॉक्स आणि गिगा टीव्ही कॉलिंग सेवेचेही घोषणा करण्यात आली आहे.

Leave a Comment