
मुंबई : रतन टाटांची ड्रीमकार असलेली नॅनो आता अखेरची घटिका मोजत आहे. गुजरातच्या साणंदमध्ये गेल्या महिन्यात फक्त एक नॅनो कार तयार झाली. छोट्या कुटुंबांना सुरक्षितपणे एकत्र प्रवास करता यावा यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅनोच्या देशांतर्गत विक्रीलाही मोठा ब्रेक लागला आहे. अख्ख्या देशात गेल्या महिन्यात फक्त तीन नॅनो कारची विक्री झाली. २१७ नॅनो गाड्य़ा गेल्या वर्षी जून महिन्यात तयार झाल्या होत्या. हा आकडा यंदा अवघ्या एका नॅनोवर येऊन ठेपला आहे. टाटा मोटर्सने यानिमित्ताने सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त गुंतवणूक केल्याशिवाय २०१९ नंतर नॅनोचे उत्पादन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. पण या अतिरिक्त गुंतवणूकीविषयी काहीही निर्णय घेतला नसल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
