लो कार्ब डाएट ठरू शकते आरोग्यासाठी अपायकारक


कर्बोदके ही आपल्या शरीराचे ऊर्जेचे भांडार आहेत हे आपल्याला माहिती आहे. कर्बोदाकांच्या सेवनानंतर शरीराला कार्यशील राहण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळते. पण आजकाल कर्बोदकांमुळे वजन वाढते, कर्बोदकांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे अशी समजूत रूढ होत असल्याने अनेक जण आपल्या आहारातून कर्बोदके अजिबात वर्ज्य तरी करतात किंवा कर्बोदकांचे प्रमाण अतिशय नगण्य करून टाकतात. ह्यालाच ‘लो-कार्ब’ डायट म्हटले जाते. अनेक शोधाभ्यासांनी देखील ‘लो कार्ब’ डायट अतिशय फायेदेशीर असल्याचे दाखले दिल्याने हे डायट आणखीनच लोकप्रिय झाले आहे.

२०१७ साली आलेल्या एका रिपोर्ट नुसार ‘ लो-फॅट ‘ डायटच्या मानाने ‘लो कार्ब’ डायट वजन घटविण्याचे अधिक प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले आहे. तसेच आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अत्यधिक असले, तर त्याचे दुष्परिणाम प्रजननशक्तीवर होत असल्याचे निदान आणखी एका रिपोर्ट मध्ये करण्यात आले आहे. विशेषतः कर्करोगातून बरे झाल्यानंतर ‘लो-कार्ब’ आहारामुळे कर्करोग पुनश्च उद्भाविण्याचा धोका कमी असल्याचे म्हटले जाते. ह्या सर्व गोष्टींमध्ये तथ्य असले, तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा अपायकारक ठरत असतो. त्याचप्रमाणे जर ‘लो-कार्ब’ डायटचा अतिरेक झाला, तर त्यापायी शरीराला आवश्यक असलेले पोषणही मिळत नाही आणि परिणामी शरीर कमकुवत बनू लागते.

जेव्हा आपण आपल्या आहाराद्वारे कर्बोदकांचे सेवन करतो, तेव्हा ‘अमायलेझ’ नामक एन्झाईम कर्बोदकांचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करते. ग्लुकोज जे आपल्या शरीराचे प्राथमिक इंधन आहे, त्याचा वापर शरीरातील सेल्युलर अॅक्टीव्हिटीज साठी होतो. आपले हृद्य, मेंदू, किडनी, स्नायू आणि मासपेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कर्बोदकांची आवश्यकता असते. शरीरातील अतिरिक्त कर्बोदके ग्लायकोजेन मध्ये रुपांतरीत होऊन, लिव्हर आणि स्नायूंमध्ये नंतर उपयोगात आणण्याकरिता साठविली जातात. ह्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

मेंदूच्या कार्यासाठी देखील कर्बोदकांची आवश्यकता असते. जर पुरेशी कर्बोदके शरीराला मिळत नसतील तर त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रथिनांचा वापर शरीर करीत असते. शरीरामध्ये त्वरित उर्जा निर्माण व्हावी ह्या कामी कर्बोदके सहायक आहेत. ग्लुकोज हे शरीराचे इंधन आहे आणि ग्लुकोज कर्बोदकांपासून तयार होत असते. त्यामुळे कर्बोदकांची कमतरता झाली, तर शरीराचे इंधनही कमी होते. तसेच शरीराला कर्बोदके योग्य प्रमाणात मिळत असली, की प्रथिनांचा अपव्यव होत नाही. प्रथिनांचे मुख्य कार्य स्नायूंना बळकटी देण्याचे आहे. त्यामुळे प्रथिने त्याच कामी वापरली जातात, असे आहारतज्ञ म्हणतात. त्यामुळे अधिक काळाकरिता शरीराला कर्बोदकांपासून पूर्णपणे वंचित ठेवल्याने शरीराला कालांतराने अपाय होऊ शकतात.

जर शरीरामध्ये कर्बोदकांची कमतरता असली, तर त्याची काही लक्षणे दिसून येतात. जर हाय कार्ब डायट कडून अचानक लो-कार्ब डायटमध्ये परिवर्तन केले गेले, तर हा बदल स्वीकारण्यासाठी शरीराला थोड्या अवधीची गरज असते. हा बदल होत असताना अशक्तपणा जाणविण्याची शक्यता असते. त्यामुळे गरगरणे, मळमळ, डोकेदुखी, थकवा अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. तसेच हातापायांचा ‘मसल मास’ कमी होणे, त्वचा निस्तेज दिसणे, केस गळती ही लक्षणे दिसून येतात. ह्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते.

लो-कार्ब डायट मुळे आपल्या शरीरातील फॅटस् व्यवस्थित रित्या खर्च होऊ शकत नाहीत, ज्यामुळे तोंडातील लाळेमध्ये आणि लघवीमध्ये कीटोन्स अधिक प्रमाणात दिसून येतात. ह्याच कारणाने लो-कार्ब डायटचा अवलंब करणाऱ्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते. तसेच ह्या व्यक्तींमध्ये बद्धकोष्ठाची समस्या देखील दिसून येते. लो-कार्ब डायटचा अवलंब करणाऱ्यांमध्ये अनेकदा स्नायू आखडणे, डीहायड्रेशन अश्या समस्या देखील दिसून येऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही