केस आणि त्वचेकरिता तांदळाच्या पाण्याचे फायदे


आपण आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकरिता, सौंदर्याकरिता अनेक क्रीम्स, लोशन्स , निरनिराळी तेले यांचा वापर करीत असतो. पण खरे तर त्वचेला तजेला आणि केसांना सुंदर चमक देण्यासाठी करावयाचा उपाय आपल्या घरामध्येच आहे. त्यासाठी आपल्याला बाजारामधून महागडी क्रीम्स, लोशन्स आणण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा उपाय म्हणजे तांदळाचे पाणी. ज्या पाण्यामध्ये तुम्ही तांदूळ शिजवून भात गाळून घेता, किंवा भात शिजविण्यापूर्वी ज्या पाण्यामध्ये तांदूळ काही काळ भिजवून ठेवले जातात, ते पाणी त्वचा आणि केस या दोन्हीच्या आरोग्याकरिता अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे आपल्या स्कीन, आणि हेअर केअर रुटीनमध्ये तांदळाच्या पाण्याचा समावेश अवश्य करा. केस आणि त्वचा यांचे सौंदर्य जपण्याकरिता हा सर्वोत्तम नैसर्गिक आणि रसायनविरहित उपाय आहे.

हे तांदळाचे पाणी तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. या पैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता. पहिल्या पद्धतीमध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये एक ग्लास तांदूळ घालून तांदळाच्या दुप्पट पाणी त्यामध्ये घालून ठेवावे. ह्या पाण्यामध्ये तांदूळ साधारण अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. मग हे पाणी गाळून घेऊन एका बाटलीमध्ये भरून ठेवावे. दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करायचा झाल्यास कुकरमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये एक ग्लास तांदूळ घेऊन त्यामध्ये तीन ग्लास पाणी घालावे. जेव्हा तांदूळ अर्धवट शिजतील, म्हणजेच त्यामध्ये थोडीशी कणी राहिली असेल, तेव्हा जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून तांदळाचे पाणी तयार करता येईल.

हे पाणी साठविताना झाकण असलेल्या बाटलीमध्ये, किंवा जगमध्ये साठवावे. हे पाणी फ्रीजमध्ये ठेऊ नये. ह्या पाण्याचा उपयोग त्वरित करता येऊ शकतो आणि पुढेही साधारण चार पाच दिवस हे पाणी वापरता येऊ शकते. हे पाणी जर जास्त जुने झाले तर त्यामध्ये साधे पाणी मिसळून वापरावे. हे पाणी पाच दिवसापर्यंत वापरता येते. त्यानंतर मात्र हे पाणी टाकून देऊन नव्याने पाणी तयार करून घ्यावे. हे पाणी तयार करण्यासाठी शक्यतो जैविक ( organic ) तांदूळ आणि फिल्टर्ड पाण्याचा वापर करावा. तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालण्याआधी किंवा शिजविण्याआधी स्वछ धुवून घ्यावेत.

केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तांदळाच्या पाण्याचा उपयोग चीनमध्ये गेली अनेक दशके केला जात आहे. चीनमधील हुआंगलाओ या गावातील स्त्रियांची नोंद, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सर्वात लांब केस असणाऱ्या स्त्रिया म्हणून झालेली आहे. लांबसडक दाट केस, या गावामध्ये सुबत्ता, दीर्घायुष्य यांसाठी शुभसंकेत समजले जातात. या स्त्रियांच्या लांबसडक केसांचे रहस्य आहे तांदळाचे पाणी. ह्या पाण्याचा उपयोग केस धुण्यासाठी केला जातो. तसेच चेहरा धुण्यासाठी देखील या पाण्याचा उपयोग केला जातो. जपान मध्ये देखील तांदळाच्या पाण्याचा वापर करण्याची पद्धत गेल्या बाराशे वर्षांपासून अस्तित्वात आहे.

ह्या पाण्यामध्ये केस आणि त्वचा यांच्या आरोग्याकरीता आवश्यक प्रथिने, ट्रायग्लिसराइड्स, लिपीड्स, कर्बोदके , फायटीक अॅसिड, इनोसिटोल, इत्यादी तत्वे आहेत. याच्या वापराने केस चमकदार आणि दाट होतात. त्वचेवरील अॅक्ने कमी होऊन उन्हामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. ह्या पाण्याच्या वापरामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा पोत देखील सुधारतो. ह्या पाण्याचा वापर स्नानासाठी देखील करता येईल. यासाठी दोन कप तांदळाचे पाणी नेहमीच्या स्नानासाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment