तुम्ही पाहिला आहे का २१ कोटींचा तळीराम रेडा ?


आजपर्यंत आपण माणूस दारू पितो हे ऐकले असेल. हे सांगणे म्हणजे काही नवल नाही. पण हरियाणातील या रेड्याला चक्क दारू पिण्याचे व्यसन जडले आहे. गावात सुलतान या नावाने प्रसिद्ध असलेल्या रेड्याचे वजन १ टन आहे. तर उंची ५ फूट ११ इंच आहे. या रेड्याची किंमत २१ कोटी असल्याची माहिती या रेड्याचा मालक नरेश कुमार यांनी स्वत: दिली आहे.

हा रेडा सर्वात चांगल्या प्रजातीचा असल्यामुळे त्याची किंमतही अधिक आहे. नरेश कुमार यांना सुलतानमुळे दर महिन्याला लाखोंचे उत्पन्न मिळते. या सुलतानने अनेक स्पर्धांमध्येही अनेक पारितोषिक देखील जिंकली आहेत. जेव्हा सुलतान घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी नरेश कुमार यांच्या घराभोवती जमते. सुलतान घराबाहेर पडला की, अनेक जणांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह अनावर होतो. नरेश रोज दिवसातून एकदा सुलतानला घेऊन फिरायला जातात.

नरेश यांनी बारक्रॉफ्ट अॅनिमल या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सुलतानला विस्की आवडत असल्याचा दावा केला असून त्याचबरोबर त्यांनी रेड्याला महागड्या ब्रँडच्या विस्की भरवतानाचे फोटोही दाखवले. जरी नरेश कुमार हे सुलतानला विस्की आवडते असे सांगत असले तरी यावर अनेक प्राणिप्रेमींनी टीका केली आहे. त्याचा मालक त्याला विस्की भरवून त्याच्या तब्येतीशी हेळसांड करत असल्याची टीका अनेक प्राणिप्रेमींनी केली आहे.

Leave a Comment