मुंबईच्या रस्त्यांवर धावणार सरकारची अत्याधुनिक ‘बाईक अॅम्ब्युलन्स’


मुंबई – अॅम्ब्युलन्स एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत वेळीच न पोहोचल्याने झालेला उशीर एखाद्याचे आयुष्य संपवू शकतो. वाहतूक कोंडीची समस्या तर मुंबईत दिवसेंदिवस वाढत चालली असून, अॅम्ब्युलन्सलाही याचा फटका बसतो. अनेकदा अॅम्ब्युलन्सलाही वाहतूक कोंडी आणि बेशिस्त चालकांमुळे तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. अनेक चालक अॅम्ब्युलन्स मागून येत असल्याचे दिसत असतानाही रस्ता करुन देण्यास नकार देतात. ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ब-याच प्रमाणात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यामुळे फायदा होणार आहे. सोबतच उपचाराअभावी होणा-या मृत्यूंचे प्रमाणही कमी होईल अशी अपेक्षा आहे.

ही बाईक अॅम्ब्युलन्स राज्य सरकारने पुढाकार घेत सुरु केली आहे. ही बाईक अत्यंत आधुनिक असून यामध्ये गरजेच्या सर्व सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य या बाईक अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर या बाईक अॅम्ब्युलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक-डॉक्टर असणार आहे.

महाराष्ट्र ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा सुरु करणारे चौथे राज्य आहे. गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये याआधी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबईपुरती मर्यादित असणारी ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा कालांतराने संपुर्ण राज्यभर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे.

या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ मुंबईतील भांडुप, मानखुर्द, नागपाडा, मालाड, चारकोप,गोरेगाव, ठाकूरगाव, कलिना आणि खारदांडा या रस्त्यांवर धावताना दिसतील. या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवेत, प्रशिक्षित डॉक्टरसह १० मोटर बाईक आहेत. ज्यांना ही ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा हवी असेल त्यांना १०८ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तुम्ही संपर्क साधल्यानंतर थोड्याच वेळात जवळ असलेली ‘बाईक अॅम्ब्युलन्स’ तुमच्या घरी पोहोचेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment