गुगलने हर्षितला दिलीच नाही ऑफर?


चंदिगढ – काही दिवसांपूर्वी चंदिगढमधील हर्षित शर्मा हा तरूण गुगलने मोठ्या पगाराची नोकरी देऊ केल्यामुळे प्रचंड चर्चेत आला होता. पण या प्रकरणात आता काही नवीन खुलासे समोर आले असून यासंदर्भात ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हर्षितला आम्ही अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे गुगलने सांगितले. त्याचबरोबर गुगलने इतक्या मोठ्या पगाराची नोकरी हर्षितला दिल्याची साधी माहितीही हरियाणा सरकारला नव्हती. या प्रकरणाचा अखेर सोशल मीडियावर गाजावाजा झाल्यानंतर चंदिगढच्या शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

गुगलने हर्षितला १ कोटी ४४ लाख रुपयांच्या गलेलठ्ठ पगाराची ऑफर दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. गुगलकडून ग्राफिक डिझायनर म्हणून सरकारी महाविद्यालयात आयटीचे शिक्षण घेणाऱ्या हर्षितची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. गुगलमध्ये तो पुढील आठवड्यात रुजू होणार असून दरमहा त्याला ४ लाख रुपये भत्ता देण्यात येईल. हर्षित प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीत ग्राफिक्स डिझायनर म्हणून रुजू होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. विशेष म्हणजे या सगळ्याला हर्षितनेही दुजोरा देत आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल आनंद व्यक्त केला होता. मला कधी गुगलकडून नोकरीची संधी चालून येईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असे त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्याशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याचा फोन बंद होता. यापूर्वी डिजीटल इंडिया मोहिमेत हर्षितने ७ हजार रुपयांचे बक्षिस जिंकले होते.

Leave a Comment