दादांचा इतिहास


मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याआधी झालेला पायाभरणी समारंभ सरकारने ज्या थाटामाटात केला तो अजित पवार यांच्या मनाचा जळफळाट करणारा ठरलेला दिसत आहे. म्हणून त्यांनी या निमित्ताने सरकारवर टीका केली आहे. सरकारला निवडणूक आली की शिवाजी महाराजांची आठवण होते असे अजित दादांनी टीकास्त्र सोडले पण आमच्या माहितीप्रमाणे आता कसलीही निवडणूक तांेंडावर आलेली नाही. अर्थात सयुक्तिक टीका करण्याबाबत दादांची कधीच ख्याती नाहीच. दादांच्या अगाध ज्ञानाचा प्रत्यय तर आणखी एक वाक्याने आला. दादा म्हणाले, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात ‘यांनीच’ अडथळे आणले होते.

पण आमच्या माहितीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा भारतीय जनता पार्टी अस्तित्वात नव्हती. मग अजितदादांना यांनीच अडथळे आणले म्हणून कोणाचा निर्देश करायचा आहे ?

अजित दादांना हातातून सत्ता गेल्यापासून चळ लागला आहे की काय असा प्रश्‍न पडावा अशी ही मांडणी आहे. त्यांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा अर्थ कळेनासा झाला आहे. आपण शिवाजी महाराजांनी मराठा जातीचे आणि महाराष्ट्राचे ठरवून टाकले आहे. ते त्यापेक्षा कितीतरी मोठे होते. महाराष्ट्रात असाच अन्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही झालेला आहे पण भाजपा सरकारने या दोन महापुरूषांच्या स्मारकांच्या उभारणीला गती का दिलेली आहे हे दादांच्या आणि तत्सम लोकांच्या लक्षात येईनासे झाले आहे. डॉ. आंबेडकर हे जगातल्या एका मोठ्या जनसमुदायाच्या परिवर्तनाचे शिल्पकार बनले आहेत. सध्या जगातल्या १०० पेक्षाही अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते. आता जग त्यांच्याकडे केवळ भारताचे आणि दलितांचे नेते म्हणून न पाहता जगभरातल्या शोषित समाजाचे नेते म्हणून पहायला लागले आहे. हाच प्रकार आता आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत होत आहे. लो. टिळकांनी त्यांच्या हयातीत अनेकदा शिवाजी महाराजांची दखल भारताचे नेते म्हणून करावी असा प्रयत्न अनेकदा केला. शिवाजी महाराजांनी तत्कालीन शाह्यांच्या विरोधात केलेले बंड हे खर्‍या अर्थाने बंड नव्हते तर ती क्रांती होती. कारण बंडात एक राजा जातो आणि दुसरा राज्यावर येतो महाराजांचे तसे नव्हते. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या राज्यव्यवस्थेला पर्यायी अशी लोककल्याणकारी राज्यपद्धती स्थापित केली होती.

१९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि कर्तबगारीवर खर्‍या अर्थाने प्रकाश पडायला लागला आणि जसजसा त्यांचा इतिहास उलगडत चालला आहे तसतसे शिवाजी महाराज हे सार्‍या जगाने आदर्श मानावेत असे युगप्रवर्तक राजे होते हे दिसायला लागले आहे. त्यांच्या संबंधीच्या अनेक कल्पना आता आपल्याला बदलाव्या लागत आहेत आणि जगातलेही अनेक इतिहासकार शिवाजी महाराजांचा इतिहास आणि चरित्र यांचा अभ्यास करायला लागले आहेत. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी पादाक्रांत केलेल्या भूमीचा विचार केला तर ती लहानच होती. परंतु लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेची जी तत्वे त्यांनी राबवली होती ती महान होती. म्हणून त्यांच्या स्वराज्याची थोरवी अशी होती की तिच्यातल्या सार्‍या रयतेला हे राज्य आपले आहे असे वाटत होते. असे का वाटत होते याचा अभ्यास झाला पाहिजे असे अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल इथलेही अभ्यासक मानायला लागले आहेत. तेव्हा आपण शिवाजी महाराजांना भारताचे महापुरुष असे मानले पाहिजे. महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट जातीचे राजे असे मानणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.

त्यांचे सारे जग दखल घेईल असे स्मारक उभे करण्यामागची खरी कल्पना ही आहे. अजितदादांच्या सरकारने या स्मारकाची घोषणा केली तेव्हा त्यांना हा व्यापक दृष्टिकोन लक्षात आला होता की नाही हे काही कळत नाही. म्हणून त्यांच्या सरकारने या स्मारकाच्या उभारणीची लगबग कधीच केली नाही. भाजपा सरकारने मात्र त्यासंबंधीच्या परवानग्या तातडीने मिळवून या स्मारकाला गती दिली. त्याच्या पायाभरणी समारंभात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांचे जगातले एक युगप्रवर्तक राजे म्हणून असलेले स्थान त्यांनी अधोरेखित केेले. आपणही आता शिवाजी महाराजांच्याकडे भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे राजे म्हणून पहायला शिकले पाहिजे. ज्यांना असे बघण्याची व्यापक आणि परिपक्व दृष्टी प्राप्त झालेली नाही असे लोक अजूनही शिवाजी महाराजांच्या निमित्ताने आपल्या राजकारणाचे क्षुद्र डावपेच लढवू पहात आहेत. ही अतीशय खेदाची बाब आहे. काही लोकांनी या स्मारकाकडे एक कंत्राट म्हणून पाहिले असेल आणि केवळ टक्केवारीचा हिशोब केला असेल तर त्यांना या स्मारकाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व कधीच लक्षात येणार नाही. त्यासाठी टक्केवारीच्या पलीकडे जाऊन राजकारण, समाजकारण करण्याचा संस्कार मनावर व्हावा लागतो.

1 thought on “दादांचा इतिहास”

Leave a Comment