
राजस्थान म्हटले की कोणाच्याही नजरेसमोर जुन्या हवेल्या, महाल आणि प्राचीन किल्ले उभे राहतात. तसेच या किल्ले, हवेल्यांसंदर्भातल्या अनेक रोमांचक कहाण्याही आठवतात. अशा प्राचीन वास्तूंशी भूताखेतांचा असलेला संबंध नवा नाही. बहुतेक ठिकाणी अशी कांही ना कांही कहाणी असतेच. जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोटा येथील ब्रजराज भवन पॅलेसचाही याला अपवाद नाही.
ब्रजराज भवन पॅलेस मध्ये आजही दिसते ब्रिटीश मेजरचे भूत
हा पॅलेस १८० वर्षे जुना आहे व या ऐतिहासिक पॅलेसचे १९८० साली ऐतिहासिक हॉटेलमध्ये रूपांतर केले गेले आहे. येथे येणार्या पर्यटकांना अथवा उतारूंना येथे वेगळा अनुभव घेण्याची संधी मिळू शकते. असे सांगतात की या महालात ब्रिटीश मेजर बर्टनचे भूत आजही वावरते आहे. ब्रिटीश काळात तो कोटा येथे पोस्टींगवर होता मात्र १८५७ च्या बंडातील बंडखोरांनी त्याला व त्याच्या मुलांना याच ठिकाणी ठार केले होते. तेव्हापासून त्याचे भूत या महालात फिरते असा समज आहे. या पॅलेसच्या एका महाराणीने हे भूत १९८० सालात पाहिल्याचे दाखलेही दिले जातात.
अर्थात हे भूत कुणालाही कसलीही इजा करत नाही. उलट मरणानंतरही हा ब्रिटीश लष्करी अधिकारी अजूनही कार्यरत राहिला आहे. म्हणजे रात्री पहार्यावर असणारे गार्ड ड्यूटी करताना झोपले तर तो त्यांच्या थोबाडीत मारून त्यांना जागे करतो असे सांगतात. या भूताला कामावर असताना कुणी सिगरेट ओढत असेल तर तेही चालत नाही. अशा लोकांनाही त्याच्या थपडीचा प्रसाद मिळतो असेही अनुभव आहेत.
