शिकवणी वर्गावर बंदी ?

vinod-tawade
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्या काही दिवसांत शिक्षणातल्या काही जुन्या रोगांवर इलाज करण्याचे विचार बोलून दाखवायला सुरूवात केली असून आता खाजगी शिकवणी वर्गावर बंदी घालण्याचा किंवा त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्याचा इरादा व्यक्त केला आहे. हा विचार योग्यच आहे पण खाजगी क्लासेसचे प्रमाण आता एवढे वाढले आहे की त्यांच्यावर कारवाई करणे दुरापास्त होऊन बसले आहे. खाजगी क्लासेसची वाढ गेल्या १५ ते २० वर्षात फारच झपाट्याने झाली. ती होतानाच्या काळातच त्यांच्यावर काही तरी कारवाई करायला हवी होती. आता साराच प्रकार हाताबाहेर गेला आहे. आता त्यावर काही कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणे मोठे कठीण होणार आहे.

क्लासवर बंदी घालताना काही मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील. एखाद्या मुलाला वर्गात शिकवलेले समजले नसेल आणि त्याला दोनदा समजावून सांगितल्याशिवाय त्याचा अभ्यासच नीट होत नसेल तर त्याला शिकवणी लावण्यात गैर काही नाही. आता आता शाळांतल्या वर्गांतल्या मुलांची संख्या फार वाढली आहे. काही शाळांच्या वर्गात तर १०० ते १२० मुले असतात. शिक्षकांना त्यांची नावेही नीट माहीत नसतात मग त्यांना शिकवलेले समजते की नाही हे पहायला सवड कोठून मिळणार? वर्गात प्रत्येकावर व्यक्तिगत लक्ष देण्याची काही सोय नाही. अभ्यासक्रम वेळेत संपवावा लागतो आणि मुलांची संख्या बेसुमार असते. अशा वर्गातल्या मुलांना खाजगी शिकवणी लावणे अपरिहार्य ठरते.

सुरूवातीच्या काळात काही मठ्ठ मुलांना आणि इंग्रजी, गणित अशा विषयांना शिकवणी लावली जायची. एखाद्या मुलाला किंवा मुलीला शिकवणी लावावी लागते हा त्याच्या साठी कमीपणा मानला जायचा. आता मात्र त्यात काही कमीपणा राहिलेला नाही आणि माकार्र्ंची स्पर्धा तीव्र झाली असल्याने सगळ्या विषयांसाठी आणि सर्व मुलांना शिकवणी लावली जात आहे. क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षार्थी चांगले घडवले जातात. आता परीक्षेला आणि मार्कांना महत्त्व आले आहे त्यामुळे पालकांनाही क्लास लावणे गरजेचे वाटायला लागले आहे. तेव्हा खाजगी क्लासेसवर बंदी घालता येणार नाही. पण काही शिक्षक वर्गात काही न शिकवता बाहेर शिकवण्या घेतात. अशा शिक्षकांवर मात्र बंदीच घातली पाहिजे. काही प्राध्यापकही शिकवण्या घेतात. त्यांनाही प्रतिबंध केला पाहिजे. कारण हे लोक वर्गात चांगले न शिकवता मुलांना शिकवण्या लावण्याचा सल्ला देतात आणि त्यातून पैसा कमावतात.

Leave a Comment