इसिस खलिफा अबू बगदादीच्या पत्नी व मुलाला अटक .

wife
इस्लामिक स्टेटचा स्वयंघोषित खलिफा अबू अल बगदादी याच्या पत्नी व मुलाला लेबानन सुरक्षा रक्षकांनी सिरीया बॉर्डरजवळ ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. खोटे पासपोर्ट दाखवून सिरीयाच्या हद्दीत घुसत असताना त्यांना पकडले गेल्याचे सांगितले जात आहे. अबूच्या पत्नीचे नांव गुप्त ठेवले गेले असून ती त्याची पहिली बायको असल्याचेही समजते. या दोघांनाही कांही दिवसांपूर्वीच अटक झाली असल्याचे अन्य वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. याचवेळी लेबानन आर्मीने नुसरा फ्रंटचा कमांडर अनस शरमाक याच्या पत्नीलाही अटक केल्याचा दावाही केला जात आहे.

रॉयटरने दिलेल्या बातमीनुसार अबूच्या पत्नीचे नांव सजा हमीद अल हुलैमी असे असून तिला या वर्षी सिरीयाच्या तुरूंगातून १३ नन्सच्या बदल्यात सोडले गेले होते. या नन्सचे इसिसने गेल्या डिसेंबरमध्ये अपहरण करून त्यांना बंदी बनविले होते. लेबाननच्या वरीष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने अबूच्या बायकोला मुलीसह ९ दिवसांपूर्वीच अटक केल्याचे सांगितले असून मुलीच्या डीएनए टेस्टमध्ये ती अबूचीच मुलगी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावाही केला आहे.

Leave a Comment