अखेर शिवसेना ५ कॅबिनेट आणि ७ राज्यमंत्रीपदांवर राजी

sena
मुंबई – नाही हो करता करता अखेर शिवसेनेने विरोधी पक्षांची बाकडी सोडून सत्ताधारी पक्षाच्या बाकड्यांवर आपला मुक्काम हलविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दीर्घकाळ सेना नेते आणि भाजप नेते यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भाजपने सेनेला ५ कॅबिनेट सह ७ राज्यमंत्रीपदे देण्याची तयारी दाखविली आणि सेनेने त्याला मान्यता दिली असल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या निधनामुळे या संदर्भातली अधिकृत घोषणा दोन दिवसांनंतर केली जाणार असल्याचेही सेनेच्या नेत्यांनी सांगितले. अंतुले यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा आहे त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल असेही सांगितले जात आहे.

सेनेचा उपमुख्यमंत्रीपदाची तसेच गृहमंत्री, महसूल मंत्रीपदाची मागणी भाजपने अखेर पर्यंत मान्य केली नाही. फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांच्याशीही फोनवरून दीर्घ चर्चा केल्यानंतरच सेनेला कुठली खाती देता येतील याची यादी दिली. त्यावर सेना नेते आणि भाजप नेते यांच्यात पुन्हा चर्चा होऊन मग अंतिम निर्णय घेतला गेला आहे. मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार याची घोषणा मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरल्यानंतरच करण्यात येणार आहे असेही सांगितले जात आहे.

सेनेच्या वरीष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सेनेकडे उद्योग, पर्यावरण, आरोग्य, एमएसआरडीसी, वाहतूक व एक्साईज ही खाती दिली जाणार आहेत. सेनेमध्ये कॅबिनेट मंत्रीपदासाठी नीलम गोर्हेा, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले जात आहे तर राज्यमंत्रीपदासाठी संजय राठोड, रविंद्र वायकर, विजय औटी, राजेश क्षीरसागर, दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि दीपक केसरकर यांची वर्णी लागणार असल्याचेही समजते.

सेना सत्तेत सहभागी झाली तर विरोधी पक्षनेतेपदावर कॉग्रेस दावा सांगेल असे काँग्रेसचे वरीष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेसच सेनेनंतर सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष आहे मात्र त्यांच्या ५ आमदारांना निलंबित करण्यात आले असल्याने त्यांचा दावा मान्य होईल वा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही असेही कांही जणांचे मत आहे.

Leave a Comment