अस्थिर पवारांचा स्थिरतेला शाप

pawar
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची शिवसेना आणि भाजपात वितुष्ट आणण्याचा उद्योग केला पण त्यांचा हा डाव आता या दोन्ही पक्षांच्या लक्षात आला आहे आणि आज त्यांनी भाजपाला लक्ष्य करताच शिवसेनेने त्याचा आनंद न मानता पवारांना चोख उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातले सरकार स्थिर राहणार नाही असा शाप पवारांनी उच्चारला. पवारांचा हा वार भाजपावर आहे पण आता पवारांच्या डावपेचांचे अंतरंग कळून चुकलेल्या शिवसेनेने पवारांना चोख उत्तर दिले आहे. पवारांनी या सरकारचे भविष्य कथन करण्याचा कितीही आव आणला तरीही शिवसेना या सरकारला पडू देणार नाही असे उत्तर शिवसेनेने दिले आहे. आजवर शिवसेना आणि भाजपात जी कटुता आली आहे. तिचा विचार केला तर पवारांचा हा टोला म्हणजे शिवसेनेसाठी भाजपाला डिवचण्याची एक संधी होती पण शिवसेनेने हा प्रकार परिपक्वपणे घेतला आणि पवारांनाच चोख उत्तर दिले. शिवसेनेचे नेते गेल्या महिन्याभरात प्रथमच शहाण्यासारखे बोलले आहेत. पवारांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. पवारांची वाटचाल एनडीए कडे सुरू असल्याच्या बातम्या काल अनेक वृत्तपत्रांत झळकल्या आणि आज पवारांनी भाजपावर पलटवार केला.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही असे दिसताच त्यांनी भाजपाला न मागता पाठींबा जाहीर केला होता. भाजपाने या पाठींब्याचा फायदा घेतला आणि शिवसेनेला भरपूर खेळविले. असा खेळ केल्याने शिवसेनेने चिडून भाजपाशी वैरच मांडले. आता या दोघांत भरपूर वितुष्ट आले असल्याची खात्री पटताच पवारांनी भाजपावर वार केला आणि भाजपाचे सरकार फार टिकणार नाही असे सांगून आपल्या कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकांस सज्ज होण्याचाही आदेश दिला. महाराष्ट्रात स्थिर सरकार आले पाहिजे असे सांगून पवारांनी स्वाभीमान गुंडाळून ठेवून भाजपाला पाठींबा जाहीर केला होता. आपण कोणालाही पाठींबा देताना राज्याला स्थैर्य मिळाले पाहिजे हीच भावना मनात ठेवत असतो असे ते म्हणाले. पवारांना स्थैर्याचा असा ध्यास लागलेला पाहणे ही एक मनोरंजक बाब होती. पवारांचे राजकारण कधीच स्थैर्यासाठी नसते. ते स्वत:ही राजकारणात स्थिर नाहीत पण त्यांना आता उतारवयात तरी स्थैर्याची किंमत कळली याचे अनेकांना समाधान वाटले होते पण गेल्या महिन्यांत स्थैर्यासाठी तळमळणार्‍या पवारांना महिनाभरात राज्यातले सरकार स्थिर राहणार नाही असा साक्षात्कार झाला. महिनाभरात असे काय घडले ?

महाराष्ट्रात काही झाले तरीही राजकीय स्थैर्य आले पाहिजे ही कल्पना मांडणार्‍या पवारांना या कल्पनेवर महिनाभरही स्थिर राहता आले नाही. हे सरकार अस्थिर होऊ देणार नाही हे आपले वचन त्यांनी पाच वर्षे तरी कायम ठेवायला हवे होते पण त्यांना आपल्या शब्दावर महिनाभरही स्थिर राहता आले नाही. शब्द फिरवण्याबाबत ते वाकबगार आहेत ही त्यांची ख्याती स्थिर रहावी याबाबत ते दक्ष आहेत असे दिसून आले. त्यांनी असा शब्द का फिरवला ? दोन दिवसांपूर्वी त्यांच्या संबंधात छापून आलेल्या बातम्या आणि हा शब्द फिरवणे यांचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला पाहिजे. त्यांची वाटचाल एनडीए आघाडीकडे होत आहे अशा त्या बातम्या होत्या. आता त्यांच्या या वाटचालीत काही अडथळे आले आहेत की काय असा प्रश्‍न पडला आहे. एनडीए आघाडीत सामील होताना जे काही लाभ पदरात पाडून घ्यायचे होेते पदरात पडत नाही असे त्यांना दिसून आले असावे. म्हणजे पवार पाठींबा आणि एनडीएत येणे याच्या बदल्यात जे काही मागत होते ते त्यांना मिळालेले नाही असे दिसतेे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर असे म्हणता येईल की, पवारांचा सौदा फिसकटला असावा म्हणजे काल हातात झाडू घेणारे पवार रात्रीतून भाजपाच्या मागे छडी घेऊन लागले.

पवारांनी असा सौदा मांडला असेल तर त्यात गैर काही नाही. कारण आता तसेच म्हणावे लागत आहे. राजकारणच अशा पातळीला आले आहे. मग या राजकारणात पवारांनी भाजपाकडे काही मागितले असेल तर ते त्यांच्या राजकारणाला शोभणारेच आहे. स्वत: पवारच अशा राजकारणाचे प्रणेते आहेत. मग काही सौदेबाजी सुरू असेल आणि तो पटण्याबाबत काही शंका असत्या तर त्यांनी हातात झाडू घेण्याची घाई करायला नको होती. पण त्यांनी याबाबत फारच उतावळेपणा दाखवला आणि भाजपाच्या नेत्यांनी अंगठा दाखवताच त्यांनी भाजपाचे सरकार पडण्याच्या गोष्टी बोलायला सुरूवात केली. पवार हे मोठे राजकारण धुरंधर नेते आहेत असे मानले जाते. त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते तर पवारांना जगातल्या काही मोठ्या राजकारणी नेत्यांतले एक नेते असे म्हणायला लागले आहेत. पण महाराष्ट्राच्या या राजकारणात त्यांनी आपल्या डावपेचातल्या भात्यातला अगदीच बोथट बाण सोडला आहे. मागे पवारांनी एकदा एकनाथ खडसे यांना उद्देशून तोडपाणीचा आरोप केला होता. त्यावर खडसे यांनी पवारांच्या तोडपाणीशी कोणीच तोड करू शकत नाही असा टोला लगावला होता. आता खडसे यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे लक्षात येत आहे.

1 thought on “अस्थिर पवारांचा स्थिरतेला शाप”

Leave a Comment