दूध दरवाढ नियंत्रणासाठी मिल्क पावडरवर निर्यात बंदी

milk
दिल्ली – देशात दुधाचे उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदविली जात असतानाही दुधाची दरवाढ सुरूच असल्याने किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार स्कीम्ड मिल्क प्रॉडक्टवर देत असलेल्या सवलती बंद करून निर्यातीवरही बंदी आणण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नुकतीच यावर चर्चा झाली असल्याचे समजते.

दुग्धजन्य पदार्थ आणि स्कीम्ड मिल्क प्रॉडक्टवर सध्या देण्यात येत असलेल्या सवलती कमी करून निर्यात बंदी केली तर देशात दुधाचा पुरवठा वाढेल व पर्यायाने दुधाचे दर कमी होतील असे जाणकारांचे मत आहे.कृषी ग्रामोद्योग योजनेअंतर्गत या सवलती दिल्या जातात. मात्र या सवलती काढल्या गेल्यास त्याचा सर्वाधिक फटका अमूल आणि मदर डेअरी यांना बसणार आहे.

एप्रिल २०१३ मध्ये चार वेळी दुधाचे दर वाढविले गेले आहेत. वर्षातली ही वाढ लिटरमागे ८ ते १० रूपये आहे. मे महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार दूध उत्पादनात ११.२८ टक्के वाढ झाली असतानाही देशात दरवाढ होत आहे. भारत हा जगात सर्वाधिक दूध उत्पादक व सर्वाधिक दूध खप असलेला देश आहे. देशात वर्षाला ४ लाख टन स्कीम्ड पावडरचे उत्पादन होते व त्यातील बहुसंख्य पावडर निर्यात केली जाते. अमूल दूध पावडर निर्यातीतील जगात पहिल्या क्रमांकाची कंपनी असून त्यांच्यातर्फे २०१३ मध्ये २० हजार टन पावडर निर्यात केली गेली आहे असेही समजते.