बीड – दोन वेळा मतदान करा ;पण बोटावरची शाई पुसण्याची दक्षता घ्या असे विधान करणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवडणूक आयोगाची माफी मागावी लागली पण राजकीय आखाड्यात काकांविरोधात शड्डू ठोकणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मात्र त्यांच्या बोगस मतदान केल्याच्या विधानावरून निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडले आहेत.
आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी आपण बोगस मतदान केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.त्यानुसार पुढील चोवीस तासांत त्यांना या नोटीसला उत्तर द्यायचे आहे. धनंजय मुंडे यांनी मतदानाबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. या वक्तव्यावरुन धनंजय मुंडेंवर चौफेर टीका झाली. त्यांचे काका आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे.