मतदानाचे पावित्र्य राखा

भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे म्हणजे  नेमके काय दिलेले आहे. याची जाणीव  भारतीय मतदारांच्या एका मोठ्या वर्गात निर्माण झालेली नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर भारतातली पुढारी मंडळी जनतेची स्तुती करतात आणि जनतेचा निर्णय शिरसावंद्य मानत असल्याचे सांगतात. परंतु ही जनता म्हणाव्या तेवढ्या गांभिर्याने मतदानाचा अधिकार वापरत नाही. ही वस्तुस्थिती  आहे. विशेषतः भारतामध्ये पैसा आणि जात या दोन घटकांचा मोठा प्रभाव मतदानामध्ये ठळकपणे दिसत असतो. आता निवडणूक आयोगाने बरीच बंधने घातली असल्यामुळे जातीपातींचा उल्लेख उघडपणे केला जात नाही.  परंतु कुजबूज मोहिमेच्याद्वारे आणि खाजगी प्रचारातून जातींचे अपिल केले जाते. खरे म्हणजे भारताचे जातीव्यवस्थेने खूप नुकसान झालेले आहे. जमाना बदलत जाईल, लोक सुशिक्षित होतील तसतशी जातीची बंधने ढिली होत जातील असे वाटले होते पण प्रकार उलटाच घडत आहे. राजकारणातून आणि मतदानातून जातीची बंधने अधिक पक्की होत चालली आहेत. आपल्या देशातील लोकांना मतदानाच्या माध्यमातून देशाचे कल्याण करायचे असेल तर त्यांनी जातीचा आणि पैशाचा विचार न करता मतदान केले पाहिजे. 

भारतीय मतदार नागरिकांना घटनेने जात, पात, धर्म, शिक्षण, व्यवसाय यांचा कसलाही विचार न करता सरसकट मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र दुर्दैवाने आपल्या देशातले बरेच मतदार या अधिकाराचे मोल न ओळखता मतदान करतात. मतदानाचा निर्णय घेताना गांभिर्याने विचार करत नाहीत. मतदार आपले मतदान जेवढे विचारपूर्वक करतील तेवढे देशाचे भवितव्य उज्ज्वल असेल. म्हणून प्रत्येक मतदाराने सखोल विचार करून आपले खासदार निवडले पाहिजेत. अमेरिका, ब्रिटन या देशातसुध्दा बराचकाळ पर्यंत सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता. अमेरिकेत १९२२ सालपर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. ब्रिटनमध्ये साधारण याच सुमारास महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला. भारतात अनेक क्षेत्रात विषमता असतानाही घटनाकारांनी सरसकट सर्वांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यावेळी सवर्ण मानसिकतेच्या काही लोकांनी असा सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यास विरोध दर्शविला होता. परंतु बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आदी नेते सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यावर ठाम राहिले. अशा रितीने कसलाही संघर्ष न करता मिळालेल्या या अधिकारामुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी वाढलेली आहे. 

मतदानाच्या बाबतीत एवढी विलक्षण समता निर्माण झालेली आहे की श्रीमंत, सुक्षिक्षित, उच्चवर्णीय व्यक्तीला एकच मत देता येते आणि गरीब, अशिक्षित, दलित नागरिकालाही एकच मत देता येते. म्हणजे देशाचे भवितव्य ठरवण्याच्या बाबतीत मुकेश अंबानी आणि  शारीरिक कष्ट करून पोट भरणारा अशिक्षित मजूर हे दोघेही एकाच पातळीवर आहेत. त्यामुळे तर सामान्य मतदारांनी विचारपूर्वक मतदान करण्याची जास्तच गरज आहे. भारतात मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटून गरिबांची मते विकत घेण्याचा प्रघात आहे. अशा भ्रष्ट मार्गाने निवडून येणारे जनप्रतिनिधी एखाद्या गरीब माणसाने कल्पनाही केली नसेल एवढे पैसे त्याच्या मतासाठी देतात आणि निवडून येऊन पुन्हा भ्रष्ट मार्गाने पैसा कमवून पुढच्या निवडणुकीत अशीच मते विकत घेण्याची तरतूद करत असतात. त्यांच्या भ्रष्ट मार्गाने पैसा कमवण्याने आपल्या सारख्या सामान्य नागरिकांचीच लूट होत असते. ती प्रत्यक्षात होत नसल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. ती लूट अप्रत्यक्षपणे होते आणि तिच्यामुळे होणारे परिणाम मात्र प्रत्यक्ष असतात. 

विकासकामे उशिरा होणे, भरपूर कर लावले जाणे आणि विकासकामे निकृष्ट दर्जाची होणे हे सगळे परिणाम अशा भ्रष्टाचाराचेच असतात. म्हणून नागरिकांनी मते विकायची नाहीत असे ठरवले तर या भ्रष्टाचाराला आळा बसेल. म्हणून सामान्य नागरिकांनी स्वतःच्या हिताचा विचार करून आपली मते विकली जाणार नाहीत. याची दक्षत घेतली पाहिजे. काही पुढारी या बाबती मोठी विपरीत भाषा वापरत असतात. ते स्वतः पैसे वाटत नाहीत. परंतु पैसे वाटणार्‍यांविषयी बोलताना, पैसे त्यांचे घ्या पण मते मला द्या असे आवाहन करतात. ही सुध्दा भाषा चुकीची आहे. पैसे कोणाचेच घेऊ नका, पैसे द्यायला कोणी आलाच तर त्याला हुसकून लावा किंवा त्याची तक्रार निर्वाचन अधिकार्‍याकडे करा असे त्यांनी सांगायला पाहिजे.

आपण  मतदानाच्या आदल्या रात्री बेसावध राहतो आणि चुकीचा निर्णय घेऊन मतदान करतो पण त्या चुकीच्या मतदानाचा परिणाम पुढच्या पाच वर्षांवर होत असतो. तेव्हा प्रत्यक्ष पैसे देणे, लोकांना तीर्थयात्रेला नेणे, जेवणावळी किंवा वैयक्तिक स्वरूपाची कामे करून देणे अशा मार्गांनी मतदारांना भुरळ पाडणार्‍या पुढार्‍यांना हाकलून लावले पाहिजे. काही नेते लोकांवर उपकार करून मुलांना नोकर्‍या लावून, रेशनकार्डे तयार करून देऊन, मुलांना प्रवेश मिळवून देऊन, अशा वेगवेगळ्या मार्गांनी म्हणजे लोकांची कामे करून मते मागत असतात. हासुध्दा एक भ्रष्टाचारच आहे. कसल्याही उपकाराच्या बदल्यात मतदारांनी मतदानाचा निर्णय करता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबतीत सांगितलेले तत्त्व फार महत्त्वाचे आहे. एखादी पतीव्रता स्त्री तिच्यावर कोणी कितीही उपकार केला तरी त्या उपकाराच्या बदल्यात आपले शील उपकारकर्त्याला  अर्पण करत नसते. त्याप्रमाणेच मतदारांनीसुध्दा कोणत्याही उपकाराच्या बदल्यात आपल्या मताचा निर्णय करता कामा नये. उपकाराची परतफेड वेगळ्या मार्गाने करू पण मतदान मात्र त्या उपकारावरून ठरवणार नाही, असा मतदारांचा बाणा असला पाहिजे.

Leave a Comment