सिंधुदुर्ग – कॉंग्रेसचे शक्तिमान नेते नारायण राणे यांच्याविरोधात दंड थोपटून त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्या प्रचारावर बहिष्कार घालताना राष्ट्रवादीलाही न जुमानणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. परिणामी आघाडी धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेस पर्यायाने राणे पिता-पुत्रांना दिलासा दिला आहे.
विशेष म्हणजे आज सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संयुक्त सभा घेण्यापूर्वीच दीपक केसरकरांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. केसरकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विक्टर डेन्टास हे राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. तर, कार्याध्यक्षपदी प्रसाद रेगे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दीपक केसरकर यांनी नीलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिल्याने मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्गात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला.
प्रदेशाध्यक्ष आव्हाड यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साहेबांचे आदेश न पाळल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र केसरकर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते त्यात काल कॉंग्रेसभवनात आघाडीच्या बैठकीत या विषयावरून राडा झाला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेतली . आज सावंतवाडीमध्ये शरद पवार यांची दीपक केसरकर यांनी हेलिपॅडवरच भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी केसरकर यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. केसरकर यांनी स्वत: राजीनामा देऊन भूमिकेवर ठाम राहिले असले तरी राणे यांच्या विरोधात दंड थोपटूनही पक्षाने आघाडी धर्मासाठी केसरकर यांना एकाकी पाडले आहे.