बॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीराची वाट

पुणे आणि मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. डॉक्टर मंडळींकडे या वाढीची सविस्तर आकडेवारी उपलब्ध नसली तरी त्यांच्या अनुभवा वरून हे प्रमाण वाढत चालले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. किडनीचे विकार वाढण्याची अन्य काही शास्त्रीय कारणे दिसत नाहीत. परंतु अनुभवी डॉक्टरांच्या मते शिशाची विषबाधा झाल्यामुळे किडनी निकामी होण्याचे हे प्रकार घडत आहेत. सध्या वीज टंचाईची परिस्थिती असल्यामुळे घरोघर इन्व्हर्टर वापरले जायला लागले आहेत आणि या इन्व्हर्टरसोबत बॅटर्‍यांचा वापर वाढत आहे. या बॅटरीचे आयुष्य संपल्यानंतर एक तर ती बॅटरी कमी किंमतीला विकून त्याच विक्रेत्यांकडून नवी बॅटरी विकत घेतली जाते किंवा काही लोक स्वत:च या बॅटर्‍यांची विल्हेवाट लावतात. ते ज्या एजंटांना जुनी बॅटरी विकतात ते एजंट कसलीही पूर्व काळजी न घेता बॅटरी उघडतात त्यामुळे आणि स्वत: विल्हेवाट लावणार्‍या ग्राहकांमुळे बॅटरीतले शिसे हवेत मिसळले जाते आणि हवा प्रदूषित होते. 

हवेच्या प्रदुषणामध्ये शिशाचा मोठा वाटा असतो. म्हणूनच सरकार अब्जावधी रुपये खर्च करून पेट्रोलमधील शिसे काढून टाकून शिसेविरहित पेट्रोल विकण्याचा आग्रह धरत असते. एका बाजूला सरकार असा खर्च करत असताना दुसर्‍या बाजूला हे बॅटर्‍या वापरणारे लोक हजारो लिटर अशुद्ध पेट्रोलमुळे होऊ शकेल एवढे हवेचे प्रदूषण एका बॅटरीची विल्हेवाट लावताना करतात. त्याचे माणसाच्या शरीरावर मोठे विपरीत परिणाम आहेत. विशेषत: या शिशाचा दुष्परिणाम लहान मुलांवर होत असतो. हे शिसे श्‍वासातून शरीरात गेल्यानंतर पूर्ण श्‍वसन संस्था निकामी करू शकते. त्याचे अंश रक्तात सुद्धा जाऊन मिसळतात. परिणामी हे प्रदूषित रक्त शरीरातल्या निरोगी पेशींना निकामी करून टाकते आणि शरीराच्या आतले अनेक अवयव क्षीण व्हायला लागतात. हे प्रदूषित शिसे मेंदूपर्यंत जाऊन पोचल्यास मुलांचे आकलन शक्ती बाधित होते. मुलांच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होतो. 

प्रौढांमध्ये अशाच प्रकारे शिसे श्‍वासातून आत गेल्यास ङ्गुफ्ङ्गुसावर परिणाम होऊन श्‍वासाला बाधा यायला लागते. आतल्या बाजूला हे सारे परिणाम होत असतानाच त्वचेवर सुद्धा काही परिणाम दिसायला लागतात आणि शिशाशी संपर्क आलेली त्वचा काळवंडायला लागते. गंभीर स्वरुपाचे त्वचा रोग व्हायला लागतात. सगळ्यात महत्वाचा बाधित होणारा अवयव म्हणजे किडनी. किडनी हे एक प्रकारचे ङ्गिल्टर आहे. त्यामध्ये शिसे गेले की, लघवी नीट होत नाही आणि दूषित द्रव्यांचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया बंद पडते. शेवटी किडनी निकामी होण्याचा धोका असतो. या सार्‍या प्रक्रियेमध्ये रुग्णाला रक्तदाब, सतत चक्कर येणे अशा अनेक विकारांना तोंड द्यावे लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment