संधीवाताचे पूर्व निदान

अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी संधीवाताच्या ऑस्टिओ आर्थ्रायटीस या प्रकाराचे निदान करण्याची नवी पद्धती विकसित केली असून ती अतीशय सोपी आणि या संधीवाताचा त्रास सुरू होण्याच्या आधीच केली जाणारी आहे. साधारणपणे संधीवात हा होण्याच्या आधी कळत नाही. सांधे आखडले जाणे आणि सांध्यांमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे असा त्रास सुरू झाला की, मग रुग्ण डॉक्टरकडे जातो आणि नंतर डॉक्टर या लक्षणांवरून त्याला संधीवात झाला असल्याचे निदान करतात. म्हणजे या प्रकारामध्ये त्रास झाल्याशिवाय निदान होत नाही. पण संंशोधकांनी नव्याने विकसित केलेल्या पद्धतीत एवढा त्रास होण्याची गरजच नाही. त्याच्या आधीच या पद्धतीने या संधीवाताचे निदान होते. तिच्या-मध्ये रुग्णाच्या सांध्यामधील द्रवाचा एक थेंब काढला जातो आणि थेंबभर द्रवाच्या विश्‍लेषणातून रुग्णाला संधीवात होणार आहे की नाही याचा शोध आधीच लागतो. पुढच्या सार्‍या यातना टळतात आणि त्याच्या आतच औषधोपचार करता येतात.  

अशा प्रकारच्या या चाचणीमुळे जगातल्या लक्षावधी लोकांच्या संधीवाताच्या वेदना टळणार आहेत आणि त्यांना दिलासा मिळणार आहे. काही वेळा संधीवाताच्या वेदना खूप वाढतात. वारंवार त्या जाणवायला लागतात आणि रुग्ण खितपत पडतो. बर्‍याच वेळा असा प्रकार घडल्यानंतर केवळ औषधोपचार केले जातात आणि शेवटी निर्वाणीचा उपाय म्हणून सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. या सगळ्या गोष्टी या नव्या निदान पद्धतीमुळे टळणार आहेत. अमेरिकेतल्या मिसुरी विद्यापीठातील संशोधकांनी ही पद्धती शोधून काढून संधीवाताच्या रुग्णांना दिलासा दिलेला आहे. या चाचणीमध्ये हा संधीवात होणार आहे की नाही, एवढेच कळत नसून तो किती तीव्र स्वरुपाचा असेल हेही कळते.  

डॉक्टरांनी या चाचणीचे काही शास्त्रीय तपशील सांगितले आहेत. त्यानुसार या थेंबभर द्रवामध्ये असलेल्या प्रोटिनच्या प्रमाणांचे निदान केले जाते आणि त्यावरून संधी-वाताचा अंदाज केला जातो आणि त्यानुसार उपचार केले जातात. या प्रकारचा संधीवात सांध्यातील हाडांच्या मध्ये असणारा वंगणासारखा द्रव कमी झाल्यामुळे होत असतो. तो हाडांच्या मध्ये हा तेलकट द्रव पसरलेला असतो आणि तोच हाडांचे संरक्षण करत असतो. मात्र हा द्रव कमी झाला की, दोन हाडे एकमेकांवर घासायला लागतात आणि त्यातून रुग्णाला वेदना व्हायला लागतात. तेव्हा हा द्रव कमी होत असल्याची सूचना वेळीच मिळाली की, मग त्या ठिकाणी काही उपचार करून द्रव कमी होण्याची प्रक्रिया बंद केली जाते आणि संधीवात टळतो. या शास्त्रज्ञांनी हा द्रव कमी होण्यास कारणीभूत असलेला मॉलिक्यूल शोधून काढला आहे. त्याचा बंदोबस्त केला की दोन हाडांच्या मधील द्रव टिकून राहतो. या संशोधनाची माहिती डेली एक्सप्रेस या नियतकालिकांत प्रसिद्ध झाली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment