पुन्हा असे बोलू नका, निवडणूक आयोगाचा पवारांना सल्ला

नवी दिल्ली- दोन वेळा मतदान करा असे धक्कादायक विधान केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यापुढे अशा प्रकारचे वक्तव्यकरुन आचारसंहितेचा भंग करु नये अशी सूचना ही आयोगाने केली आहे. 

२३ मार्च रोजी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली. 

पवारांच्या या विधानावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने पवारांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पवारांनी याप्रकरणी आयोगाची माफी मागितली होती. तसेच हे प्रकरण बंद करावे अशी विनंती केली होती. पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर निवडणूक आयोग समाधानी नाही. अशा प्रकारचे वक्तव्यकरून कायद्याचा भंग केल्याचे आयोगाने म्हटले आहे. मात्र पवारांनी माफी मागितल्यामुळे हे प्रकरण पुढे वाढवणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.