वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत; पाकचे आव्हान संपुष्टात

मीरपूर – कर्णधार सॅमी व ड्वेन ब्राव्होची फटकेबाजी आणि सॅम्युअल बद्री व सुनील नारायणच्या फिरकीच्या जोरावर गतविजेत्या वेस्ट इंडिजने टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये निर्णायक सामन्यात पाकिस्तानवर ८४ धावांनी मात करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा सामना ३ एप्रिल रोजी श्रीलंकेशी होईल. 

साखळी फेरीत आतापर्यंत विंडीज व पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकची सुरुवात वाईट झाली. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावणारा अहमद शेहझाद आणि कामरान अकमल हे दोघे सलामीवीर खाते न उघडताच माघारी परतले. बद्री आणि नारायणच्या फिरकीसमोर पाकचे मधल्या फळीतील फलंदाजही टिकाव धरू शकले नाहीत. शाहिद आफ्रिदीने दोन षटकार खेचून आश्वासक सुरुवात केली होती. परंतु, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. त्याच्यापाठोपाठ तळाच्या फलंदाजांनाही झटपट गुंडाळून विंडीजने ८२ धावांत पाकचा डाव संपवला. 

विंडीजकडून बद्री व सॅम्युअल्स यांनी प्रत्येकी ३, तर आंद्रे रसेलने २ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ड्वेन स्मिथ व ख्रिस गेल या सलामीवीरांना संघाला अपेक्षित सुरुवात करून देता आली नाही. पहिल्या चार षटकांतच स्मिथ व गेल माघारी परतल्याने विंडीजच्या धावगतीला ब्रेक लागला. सॅम्युअल्स व रामदिनही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. चौदाव्या षटकाअखेर विंडीजची अवस्था ५ बाद ८१ अशी झाली होती. मात्र, ड्वेन ब्राव्हो आणि कर्णधार डॅरेन सॅमी यांनी विंडीजला संकटातून बाहेर काढले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. 

सुरुवातीला सावध फलंदाजी करणाऱ्या दोघांनी डावाच्या अखेरीस आक्रमक पवित्रा घेत अठराव्या षटकात २१, तर एकोणीसाव्या षटकात २४ धावा वसूल केल्या. ब्राव्होने २६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६, तर सॅमीने २० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४२ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर ब्राव्हो बाद झाल्यानंतर सॅमीने ५ चेंडूत १४ धावा फटकावून विंडीजला १६६ पर्यंत मजल मारून दिली.

Leave a Comment