मनसेत उत्साह दिसतो – पवार

मुंबई  – ‘शिवसेनेत पूर्वीचा उत्साह व धडपड दिसत नाही. मनसेत ​जिद्द व उत्साह दिसतो. उद्धव ठाकरे यांना ​आपल्या वडिलांची पक्षसंघटना वारसाहक्काने मिळाली; तथापि, राज ठाकरे यांनी आपली पक्षसंघटना स्वतःहून कष्ट करून निर्माण केली. त्यामुळे राज यांनी कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे’, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृ‌षिमंत्री शरद पवार यांनी ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकीवर मार्मिक भाष्य केले. 

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये एकवाक्यता असून, गतवेळच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या जागा आणखी पाच ते सात ठिकाणी वाढतील, असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला. राष्ट्रवादीच्या नरिमन पॉइंटच्या मुख्यालयात काही पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे भाष्य केले. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने होणारी टीका यावर थेट टिपणी करण्याचे त्यांनी टाळले.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपले वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर ​राजकारणविरहित, मित्रत्वाचे संबंध होते. आपण अनेकदा त्यांना भेटायचो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचे योगदान आहे. शिवसैनिकांचे प्रेरणास्त्रोत बाळासाहेब होते. मात्र, शिवसेनेतील पूर्वीची धडपड व उत्साह आता दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Leave a Comment