शरद पवारांचे बोगस व्होटींगला प्रोत्साहन

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे संयमी राजकारणासाठी ओळखले जातात. मात्र, आज (रविवार) नवी मुंबईतील प्रचारसभेत त्यांचाही तोल ढळल्याची टीका विरोधक करत आहेत. पवारांनी जाहीर भाषणातून बोगस व्होटींगचा सल्ला दिल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.  नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत पवार म्हणाले, ‘गेल्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मतदान झाले होते. 

यंदा मात्र, साता-यात 17 तारखेला आणि मुंबईत 24  एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे आधी गावाकडे घड्याळावर शिक्का मारा आणि नंतर मुंबईत येऊन घड्याळाचे बटन दाबा.’ असा दोन वेळा मतदान करण्याचा सल्ला देतानाच पवारांनी, मतदान केल्याची खुन –  बोटावरील शाई मिटवायला विसरु नका.  नाही तर घोटाळा व्हायचा, हे सांगायलाही ते विसरले नाही.  शरद पवार यांच्याच्यासारख्या जाणत्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांच्या माफीची मागणी केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘पवार माथाडी कामगारांच्या सभेला संबोधित करीत होते. माथाडी कामगारांच्या हातांना काम करताना शाई लागते. ती पुसून मतदान करा, असा सल्ला त्यांनी दिला.  

दोन वेळा मतदानाचा सल्ला राष्ट्रवादी कधीही देणार नाही. ‘ नवाब मलिक यांचा खुलासा हस्यास्पद आहे. असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले.