वर्धा मतदारसंघात मेघेंची प्रतिष्ठा पणाला

विदर्भातल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण दत्ता मेघे यांनी स्वतः निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. या पूर्वी २००९ साली ते वर्धा मतदारसंघातून निवडून आले होते. आता निवृत्ती जाहीर करताना त्यांनी आपल्या मुलाला तिकिट मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. मात्र त्यात एक अडचण येऊन गेली आणि अडचणीनंतर का होईना पण दत्ता मेघे यांचे चिरंजीव सागर मेघे यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. 

वर्धा मतदारसंघात कॉंग्रेसमध्ये मेघे आणि कै. प्रभा राव यांना मानणारे दोन गट आहेत आणि सागर मेघे यांना तिकिट मिळण्यापूर्वी या गटामध्ये चुरस लागली. राहुल गांधी यांच्या योजनेतून पक्ष कार्यकर्त्यांच्या मतदानातून उमेदवार ठरवण्यासाठी वर्धा मतदारसंघाची निवड झाली. या पध्दतीने उमेदवार निवडला गेला तर कदाचित आपल्या मुलाला उमेदवारी मिळेल की नाही या शंकेने ग्रासलेल्या दत्ता मेघे यांनी या योजनेला सुरूवातीला विरोध केला. 

प्रभा राव यांच्या कन्या विद्या टोकस या निवडीच्या प्रक्रियेमध्ये उतरल्या होत्या. त्यांनी जोर धरला असता तर सागर मेघेंची उमेदवारी काही खरी नव्हती. म्हणून दत्ता मेघे यांनी कोशीश करून पाहिली. पण राहुल गांधी ठाम राहिले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मतदान होऊन सागर मेघेंनाच उमेदवारी मिळाली. आता या निमित्ताने जी चुरस झाली त्या चुरशीमुळे या दोन गटात परस्परांविषयी किल्मिष निर्माण झाले असून त्याचा परिणाम सागर मेघे यांच्यावर  होण्याची शक्यता आहे. 

वर्धा हा छोटा जिल्हा आहे. त्यामुुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा  समावेश केलेला आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात, दोन मतदारसंघ भाजपा-सेना युतीच्या ताब्यात आणि दोन मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात आहेत. सागर मेघे यांच्या विरोधात महायुतीतर्फे भाजपाचे रामदास तडस उभे आहेत. ते खरे म्हणजे दत्ता मेघे यांचे चेले आहेत. पण आता आपल्याच गुरुच्या मुलाच्या विरुध्द उभे आहेत. या मतदारसंघात १५ लाख ३० हजार मतदार आहेत आणि तो  कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र असे असले तरी यावेळचे चित्र फार वेगळे राहील असा अंदाज आहे. किंबहुना हे चित्र असे राहील असे कॉंग्रेसच्याच लोकांचे म्हणणे आहे. कारण दीड लाख नवे मतदार नोंदले गेले आहेत. ही दीड लाख नवी मते आणि अडीच ते तीन लाख आंबेडकरी समाजाची मते यांचा लाभ युतीला होईल असे वाटते. 

या अनुकूल वातावरणावर मात करण्यासाठी दत्ता मेघे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. या मतदारसंघातून सामना सरळ होईल असे दिसते. आम आदमी पार्टीने डॉ. महंमद अली यांना उमेदवारी दिली आहे आणि निवडणूक तिरंगी करण्याचा प्रयास केला आहे. मात्र डॉ. महंमद अली यांना या जिल्ह्यात फारसे कोणी ओळखत नाही. परिणामी रामदास तडस आणि सागर मेघे या दोघांत चुरशीची लढत होईल.

Leave a Comment