मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी मदत करणा-या गुजराथी बांधवांवर गुन्हे दाखल करणारे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे संकुचित मनोवृत्तीचे नेते असल्याची टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. सर्व राज्यातील लोकांना आपले न मानणारे नेते देशाचे नेतृत्व कसे करणार; असा सवालही त्यांनी केला.
मागील वर्षी महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील लोकांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना चारा छावणीसाठी तीन- चार महिने चारा पाठवून मदत केली. मात्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुजरातमध्येही सुष्क़ाळ असताना या लोकांनी तस्करी करून चारा महाराष्ट्रात पाठविला असा आरोप ठेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले; असा आरोप पवार यांनी मोदी यांच्यावर केला.
मोदींना देशाचा इतिहास माहित नसल्याची टीकाही पवार यांनी केली. मोदी यांनी नुकतेच विदर्भाच्या दौ-यात वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात बोलताना; चले जावचा नारा याच ठिकाणावरून देण्यात आल्याचे विधान केले होते; याचे उदाहरण पवार यांनी दिले. वास्तविक चले जावचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला आणि त्यासाठी महात्मा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांना अटकही करण्यात आली; हे पवारांनी निदर्शनास आणून दिले.
भाजपने निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. असा प्रकार आपण आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीच पाहिला नव्हता. वास्तविक निवडून आलेले खासदार आपल्यातील एकाला पंतप्रधान म्हणून निवडतात. अशी पद्धत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.