नाट्य संमेलनाचे शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तर समारोप केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात हे संमेलन पंढरपूरच्या चंद्रभागा मैदानावरील शं. ना. नवरे नाट्य नगरीत पार पडणार आहे.

संमेलन ३१ तारखेला सुरू होणार असले तरी त्याचे औपचारिक उद्घाटन शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद नामवंत नाट्य-दिग्दर्शक निर्माते अरुण काकडे यांच्याकडे राहणार आहे. या उद्घाटन समारंभाला मावळते अध्यक्ष मोहन आगाशे हेही उपस्थित राहतील.

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी काल संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला. उद्घाटन समारंभाला राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्रीही हजर असतील असे त्यांनी सांगितले. समारोप समारंभ दि. २ रोजी संध्याकाळी श्री. शरद पवार यांच्या हस्ते होणार असून त्या कार्यक्रमाला भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हेही उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment