भेडाघाट – संगमरवरी खडकांची अपूर्व शोभा

मध्यप्रदेशात पर्यटनाला आता चांगलीच चालना मिळाली असून येथील घनदाट जंगले, निसर्गाची विविधता दाखविणारी अनेक ठिकाणे, कोसळते फेसाळते धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. भेटाघाट हे असेच नितांतसुंदर पर्यटन स्थळ. जबलपूर पासून केवळ २० किमीवर असलेले हे ठिकाण म्हणजे अद्भूत आणि चमकत्या संगमरवरी खडकांचे ठिकाण आहे. मधून वाहणारा फेसाळता नर्मदेचा प्रवाह डोळ्याचे पारणे फेडतो.

या ठिकाणी सुमारे १०० फूट उंचीच्या संगमरवरी खडकांतून नर्मदा वाहते. हा पटटा जवळजवळ दोन किमी लांबीचा आहे. उंच चमकत्या संगमरवरी खडकातून वेगाने सुसाट वाहणारी नर्मदा कांही काळ हृदयाचा ठोका चुकवते. कोवळ्या सूर्यप्रकाशात हे दृष्य अधिकच देखणे दिसतेच पण नितळ चंद्रप्रकाशात त्याची शोभा वर्णन करणे शब्दांपलिकडचे आहे. चंद्रप्रकाशाची अशी कांही जादू या संगमरवरी खडकांवर होते की हे खडक म्हणजे स्वप्ननगरीतील डोंगर भासतात. मनाला शांतता आणि डोळ्याची तृप्ती करणारे हे दृष्य पाहण्यासाठी पौणिेमेच्या जवळ पर्यटकांची एकच गर्दी होते.या प्रवाहात नौकाविहारही करता येतो आणि अगदी थोडक्या पैशात नावाडी नर्मदा प्रवाहातून ही सैर घडवितात.

येथून जवळच असलेला धुंवाधार धबधबाही पाहायलाच हवा असा. कांही फूट खोल नर्मदेचा प्रवाह येथून कोसळतो आणि उलट उडणारे तुषार तनमनाला अगदी चिंब करतात. जगात फार थोड्या ठिकाणी असे दृष्य पाहायला मिळते. या स्थळाला भेट देण्यासाठी विमान, रेल्वे, रस्ता असे सर्व मार्ग खुले आहेत. जबलपूरपासून बस, टेंपो, टॅक्सीही मिळते. राहण्यासाठी चांगली हॉटेल्सही आहेत.

Leave a Comment