आठवलेना उमेदवारी देऊन शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण

मुंबई- महायुतीत रिपाईचा समावेश झाल्यानंतर रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी द़यावी असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले असे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे.

भाजपने रिपाई नेते रामदास आठवले यांना उमेदवारी देऊन इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षाने १९५० दशकात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा मुंबईत व भंडा-यात पराभव केला होता. त्यावेळी तत्कालीन जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबडेकरांना बंगालमधून राज्यसभेवर पाठवले होते. आताही आम्ही आठवलेंना पाठवत हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मुंडे यांनी सांगितले. रामदास आठवले यांना महायुतीत घेताना बाळासाहेबांनी युतीकडून तुम्हाला राज्यसभेत पाठवले जाईल हे वचन दिले होते ते भाजपने पूर्ण केल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, ‘केंद्रीय समितीने आठवले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. पक्षाचे महामंत्री अनंतकुमार यांनी फॅक्सद्वारे ही माहिती प्रदेश भाजप कार्यालयाला कळविली आहे. रामदास आठवले यांना युतीतही फसविले जाणार असा प्रचार काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. मात्र, आम्ही हे सारे समज खोटे ठरविले आहेत. आठवलेंना आम्ही सन्मानाने महाराष्ट्रातही सत्तेत वाटा देणार आहोत. राज्यसभेच्या खासदारकीसोबत एनडीएमध्ये स्थान व सत्तेत वाटा हे आठवलेंसाठी डबल प्रमोशन आहे. काँग्रेसवाल्यांनी त्यांचा दिल्लीतील काढून घेतलेला बंगलाही त्यांना परत मिळणार आहे.’

Leave a Comment