सुप्रिया सुळेंविरोधात लढण्याची हिम्मत उद्धवनी दाखवावी- भास्कर जाधव

मुंबई- शरद पवार यांनी हिम्मत असेल तर शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढावी या उद्धव यांच्या आव्हानाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर केले असून उद्धव यांनीच हिम्मत असेल तर सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी असे उलट आव्हान दिले आहे. उद्धव यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांना वरील आव्हान दिले होते.

या संदर्भात जाधव म्हणाले की पवार साहेबांनी या अगोदरच लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना आव्हान देण्यात कांही मतलबच नाही. पेक्षा उद्धव ठाकरे यांनीच सुप्रियाताईंविरोधात रिंगणात उतरावे. उद्धव यांच्याकडून सभ्य भाषेची अपेक्षा नाही असे सांगतानाच त्यांनी शरद पवारांनी आजवर अनेकांना पराभवाची चव चाखविली असल्याचेही सांगितले. सेनेचे सात खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगून ते म्हणाले की या खासदारांनी काँग्रेसशी युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र आमची काँग्रेसबरोबरची युती कायम राहणार आहे.

शिवसेना प्रमुखांचे पुत्र जयदेव यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती असा गौप्यस्फोट करतानाच जाधव यांनी जयदेव यांना शरद पवार यांनीच राष्ट्रवादीत येण्यापासून थांबविले असल्याचेही सांगितले.

Leave a Comment