प्रिन्स चार्लस अधिक जबाबदारी घेण्याच्या तयारीत

लंडन – ब्रिटीश राजघराण्याचे राजपुत्र ,प्रिन्स ऑफ वेल्स चार्लस यांच्यावर राजघराण्याशी संबंधित अधिक जबाबदारी सोपविण्याचा निर्णय विचाराअंती राणी एलिझाबेथ यांनी घेतला असल्याचे वृत्त आहे. राणी येत्या एप्रिलमध्ये ८८ वर्षांची होत आहे आणि वयामुळे राज्याच्या सर्वच जबाबदार्‍या पार पाडणे अवघड जात असल्याने कांही महत्त्वाच्या जबाबदार्‍या प्रिन्स चार्लस वर सोपविल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. प्रिन्स चार्लस यांनी केमिला पार्कर यांच्याशी दुसरे लग्न केले आहे आणि इंग्लंडमध्ये घटस्फोट अथवा दुसरे लग्न केलेल्या व्यक्तीला राजगादीवर बसता येत नाही असा नियम आहे. मात्र तरीही चार्लस यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपवून त्यांची राजा बनण्यासाठीची वाटचाल सुरू होत असल्याचे सध्या दिसत आहे.

राणी एलिझाबेथसाठी काम करणार्‍या वरीष्ठ सूत्रांकडून मात्र या बातमीचा इन्कार केला गेला आहे. राणीचे आगामी वर्षातले सर्व कार्यक्रम बुक असल्याच त्यांचे म्हणणे आहे. मात्र परदेशी राजदूतांशी भेटी, परदेश दौरे, गुंतवणुकीबाबतचे निर्णय तसेच पंतप्रधान भेटी असे महत्त्वाचे काम राणीने चार्लस यांच्याकडे सुपूर्द केल्याचे लंडनमधील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. चार्लस हे राणीचे ज्येष्ठ पुत्र आहेत.