बायको बदलल्याची नवर्‍याची तक्रार

लखनौ – नवरा बायकोतील अंतर्गत कलह, घरगुती हिंसाचार या संदर्भातल्या केसेस पोलिसांत दाखल होणे ही सर्रास बाब असली तरी लखनौ पोलिसांसमोर एक निराळीच केस आव्हान म्हणून उभी राहिली आहे. आणि त्याचा निर्णय पोलिस कांही समाजिक प्रतिष्ठीत लोकांसमवेत व्हिडीओ पाहून घेणार आहेत असे वृत्त आहे.

हकीकत अशी की आग्रा येथे दीड वर्षापूर्वी एक शिक्षिका आणि पदवीधर व पोलिसांत भरती होण्याची तयारी करत असलेला युवक यांचे लग्न झाले. लग्नानंतर रितीप्रमाणे नवविवाहिता माहेरी गेली. तिला आणण्यासाठी नवरोजी भावासह गेले. बायको परत आणली पण घरी आल्यानंतर नवरोबांना अशी शंका आली की ज्या मुलीशी त्यांनी लग्न केले ती ही मुलगी नाही. आपली बायको बदलली गेली आहे. वाद वाढला तेव्हा माहेरचे लोक येऊन मुलीला माहेरी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी महिला पौलिस चौकीत जाऊन हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रारही केली.

पोलिसांनी संबंधित वराला बोलावले तेव्हा त्याने मात्र वरील कथा पोलिसांना सांगितली. इतकेच नव्हे तर लग्नात काढलेला व्हिडीओ पाहून खात्री करून घेण्याचीही विनंती केली. आता २ फेब्रुवारीला पोलिस समाजातील कांही प्रतिष्ठीत व्यक्तींसह लग्नाचा व्हिडीओ पाहून काय तो निकाल करणार आहेत असे समजते.

Leave a Comment