शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी जातीने लक्ष घालू – शरद पवार

मुंबई – शिवसेनाप्रमुख आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मैत्री जगप्रसिद्ध आहे, त्यांनी राजकारणावरून एकमेकांवर टीका केली असली तरी त्यांनी आपले घरगुती संबंधात कधीही दुरावा आणू दिला नाही. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्वत: जातीने लक्ष घालू, असे आश्‍वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी स्मारकाच्या मुद्यावरून, आज सोमवारी पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी हे आश्‍वासन दिले आहे. राऊत आणि देसाई यांनी आज दुपारी शरद पवारांची भेट घेऊन स्मारकाविषयी चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी खुद्द शरद पवार यांनीच मुंबईत बाळासाहेबांचे भव्य स्मारक असायला हवे, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण बाळासाहेबांच्या निधनाला वर्ष सरले तरी स्मारकाचा आराखडाही तयार झालेला नाही. त्यामुळे पवारांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंती शिवेसेना खासदार संजय राऊत आणि आमदार सुभाष देसाई यांनी यावेळी केली. यासाठी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे आश्‍वासन पवारांनी दिले.

कालच बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावरून पालिकेच्या इच्छाशक्तीवर बोट ठेवले होते आणि म्हणूनच शिवसेनेचे नेते कामाला लागले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.