सोने तस्करीचा आलेख चढताच

मुंबई – सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात केलेली वाढ आणि आयातीवर घातलेले कडक निर्बंध यामुळे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यातील सोने आयात केवळ १० टन असूनही भारतीय बाजारात सोन्याची म्हणावी तशी टंचाई न जाणविण्यामागे सोने तस्करीत झालेली प्रचंड वाढ कारणीभूत असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय सीमा भागातून ही तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असून  केवळ जुलैतच किमान ४० ते ५० टन सोने तस्करी मार्गाने आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑल इंडिया जेम्स अॅन्ड ज्युवेल ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष हरीश सोनी म्हणाले की भारतात सोन्याची उपलब्धता हा मोठा इश्यू असतो. ग्राहकाला कोणत्याही परिस्थितीत नाराज करणे सराफांना परवडत नाही. त्यामुळे अर्थ मंत्रालयाकडे आयात शुल्क कमी करण्याची तसेच आयाती संदर्भात ८० – २० असे प्रमाण ठरविण्याची मागणी आम्ही केली आहे. म्हणजे ८० टक्के सोने आयात केले तर २० टक्के निर्यातीचे निर्बंध असावेत. बाकी कोणतेही नियम असू नयेत.

मात्र जेम्स अॅन्ड ज्वुवेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने जाहीर केलेले आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यात सोने आयातीत ६२ टक्के घट होऊनही दागिन्यांची निर्यात ३५ ते ३८ टक्क्यांवर आहे याचाच अर्थ अधिकृत आयातीबाहेरही सोने देशात येत आहे. कारण देशातील मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाणही फारसे व्यस्त नाही. कांही देशात तेथील सोने मागणीत अचानक वाढ झाली आहे याचाच अर्थ तेथील सोने अवैध मार्गाने भारतात आणले जात असावे असा संशय घेण्यास जागा आहे. सरकारने निर्बंध उठविले नाहीत तर सोने तस्करीचा आलेख वाढताच राहील असा इशाराही या क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.