देशातील पहिल्या महिला बँकेचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते

मुंबई – देशातील पहिल्या भारतीय महिला बँकेचे उद्घाटन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते मुंबईत १९ नोव्हेंबरला केले जाणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हा जन्मदिवस आहे. उद्घाटनाबरोबरच या बँकेच्या सात शाखा सुरू होत असून त्यात कोलकाता, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गुवाहाटी व मुंबईचा समावेश आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या बँकेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. मात्र तेथे सध्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली असल्याने मुंबईत उद्घाटन केले जात आहे. या बँकेने  ३१ मार्च २०१४ पर्यंत २५ शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे.२०१३-१४ च्या अर्थसंकल्पात या बँकेच्या स्थापनेची घोषणा केली होती व त्यासाठी १ हजार कोटींचे भांडवलही देण्याची तरतूद करण्यात आली होती.

ही बँक केवळ महिलांसाठी काम करणार आहे. उद्योजक महिलांना कर्जवाटप, बचत गट, महिला सबलीकरणासाठीचे उद्योग यांना प्राधान्य दिले जाणार आहे. याच आठवड्यात उषा अनंतसुब्रह्मण्यम यांची सरकारने या बँकेच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका म्हणून नेमणूक केली आहे. त्या यापूर्वी पंजाब नॅशनल बॅकेत काम करत होत्या.