अजित पवार हटाव- उद्योजकांची मागणी

पुणे – वीज दरातील वाढीविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या महाराष्ट्रातील उद्योजकांनी एकमुखाने उर्जा मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हटविण्याची मागणी केली आहे. आंदोलनाच्या कार्यक्रमानुसार आजपासून अजित पवार जेथे जेथे जातील तेथे काळ्या फिती लावून उद्योजक काम करणार आहेत तर १० डिसेंबर रोजी मुंबई पुणे हायवे बंद करून चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे असे समजते. १० डिसेंबरला राज्यातील सर्व उद्योग बंद ठेवले जाणार आहेत.

या संदर्भात मुंबईत बुधवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर, महाराष्ट्र वीज ग्राहक सेवा संघ, नाशिक अंबड उद्योजक संघटना, चेंबर ऑफ मराठवाडा लघुउद्योग असो, विदर्भ उद्योग संघटना यांची बैठक झाली. उद्योजक संघटनांचे समन्वयक प्रताप होगाडे या संदर्भात माहिती देताना म्हणाले की, राज्यातील सध्याच्या उर्जा स्थितीला मंत्री जबाबदार आहेत. गेल्या वर्षात वीजेची मागणी वाढलेली नाही, वीज उत्पादन कंपनीची क्षमता ४७ टक्कयांवर आहे. वीजेअभावी टेल्कोने त्यांचे ७० टक्के उत्पादन राज्याबाहेर हलविले आहे. स्टील कारखाने फक्त रात्रीतच चालविले जात आहेत .याचाच अर्थ राज्यात उद्योग, कृषी आणि यंत्रमाग उद्योग संकटात आहेत.

उद्योजक, शेतकरी आणि यंत्रमागधारक वाढविलेल्या वीज दराबाबत सतत आंदोलने करत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दीडपट दराने वीज दिली जात आहे व वीजदर वाढीमागचे कोणतेही सबळ कारण अजित पवार यांनी दिलेले नाही. वीज मंडळातून वितरणात होत असलेली गळती, भ्रष्टाचार आणि वीज मंडळाची अकार्यक्षमता पुरेशी वीज नसण्यास कारणीभूत असतानाही अजित पवार यांनी भ्रष्टाचारी सचिव अजित मेहता यांना पाठिशी घातले आहे. त्यामुळे आम्ही अजित पवार हटाव अशी मागणी करतो आहोत.

Leave a Comment