मनमोहनसिंग यांच्या परदेश वाऱ्यांवरचा खर्च ६५० कोटींवर

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधापद गेली १० वर्षे भूषविणारे मनमोहनसिंग यांनी आजपर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्यांचे रेकॉर्ड मोडले असून गेल्या १० वर्षात त्यांनी ७० परदेश वाऱ्या केल्या आहेत आणि त्यासाठी तब्बल ६५० कोटी रूपये खर्ची पडले आहेत. या विक्रमामुळे त्यांना नॉन रेसिडेंट पंतप्रधान अशी उपाधीही प्राप्त झाली आहे.

मननोहनसिंग प्रवासासाठी कधीही रात्रीची फ्लाईट घेत नाहीत. अटलजींप्रमाणे जेवणात त्यांना गोल्डन प्रॉन्झ लागत नाहीत अथवा बॉलिवूड सिनेमेही ते फ्लाईटवर पाहात नाहीत. तर आपला वेळ ते वाचन करण्यात सत्कारणी लावतात असे सांगितले जात असले तरी भारताच्या सर्व माजी पंतप्रधानांना त्यांनी परदेश वाऱ्यांमध्ये मागे टाकले आहे. पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या टर्ममध्ये त्यांनी आत्तापर्यंत ३६ परदेश वार्‍या केल्या आहेत व ३७ वी रशिया चीन वारी रविवारी सुरू झाली आहे. निवडणुकांपूर्वी ते अरब अमिरातीची वारीही करणार आहेत.

विशेष म्हणजे पार्लमेंट सुरू असताना आणि देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा सुरू असतानाही ते परदेश दौर्‍यावर गेले आहेत. इंदिराजी, नेहरू आणि अटलजी यांनी मात्र पार्लमेंट सुरू असताना परदेश वारी केलेली नाही. मनमोहनसिंग यांनी २०१२ सालात केलेली मेक्सिको ब्राझीलची आठवडाभराची वारी सर्वाधिक खर्चिक ठरली असून या वारीसाठी २६.९४ कोटी रूपये खर्च झाल्याचे आकडेवारी सांगते.

अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या १९९९९ ते २००४ या कार्यकाळात३५ परदेश वार्याय केल्या व त्यासाठी १८५ कोटी रूपये खर्च केला गेला होता. मनमोहनसिग यांच्या वार्‍यामुळे देशाचा म्हणावा तसा फायदा मात्र झालेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांची भेट औपचारीक ठरली तर पाक पंतप्रधान शरीफ यांची भेट तर निष्फळच ठरली असल्याची टीकाही केली जात आहे.