बनावट समर्थकांची राजकीय नेत्यांकडून जोरदार खरेदी

भोपाळ – आधुनिक युगातील निवडणूकाही आता अत्याधुनिक माध्यमांच्या सहाय्याने लढणे सर्वच राजकीय पक्षांना कर्मप्राप्त बनते आहे आणि त्यात आपल्याला किती समर्थक आहेत हे दाखविण्यासाठी सोशल मिडीया साईटचा वापर अत्यावश्यक बनला आहे. शक्तीप्रदर्शन हा राजकीय नेत्यांना करावाच लागणारा लोकप्रिय शो आता सोशल मिडियाच्या सहाय्याने केला जात असून इंटरनेटवरील अनेक कंपन्या असे समर्थक मिळवून देण्यासाठी या राजकीय नेत्यांना मदत करत आहेत. अनेक कंपन्यांनी असे बनावट समर्थक विकण्याचा व्यवसाय सुरू केला असून हा व्यवसाय अतिशय तेजीत आहे. कारण निवडणुका आता तोंडावर आल्याने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार व अन्य महत्त्वाचे नेते अशा बनावट समर्थकांची जोरदार खरेदी या कंपन्यांकडून करत आहेत.

आपले म्हणणे, आपली ध्येये जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक, ट्वीटर या सारख्या साईटचा उपयोग राजकीय नेते करत आहेत. त्याचा फायदा उठवून डाऊमी सारख्या कंपन्या बनावट समर्थक देण्यासाठी ऑनलाईन ऑफर्स देत आहेत. या ऑफरप्रमाणे ६५ डॉलर्समध्ये १० हजार फेसबुक फॉलोअर पुरविले जात आहेत तर ७०० रूपयांत १ हजार फॉलोअर दिले जात आहेत. फास्ट फॉलोअर, बाय रियल मार्केटिग, गेट मोअर फॉलोअर, फॉलोअर्स सेल अशा विविध नावानी या ऑफर अनेक कंपन्यांकडून दिल्या जात आहेत. कुणी २४ तासात तर कांही कंपन्या कांही दिवसांत नेत्यांना हवे तेवढे फॉलोअर देण्याच्या ऑफरही देत आहेत

यापूर्वीही अशाच कांही कंपन्यांनी फेसबुक लाईक्स विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता मात्र फेसबुकनेच त्याला आक्षेप घेतल्याने तो बंद झाला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही असाच बनावट फॉलोअर खरेदी केल्याचा आरोप भाजपने लावला असून त्याच्या समर्थनार्थ पुरावेही सादर केले आहेत. मोदी व थरूर यांच्यापेक्षा आपले अधिक फॉलोअर असल्याचे गेहलोत यांनी एका तुर्की आय.टी कंपनीच्या माध्यमातून दाखवून दिले होते.

दुसरीकडे काँग्रेसने मोदी यांनी ट्वीटरवर बनावट फॉलोअर मिळविण्यासाठी १५० कर्मचार्‍यांची फौजच तैनात केली असल्याचा आरोप केला आहे. एका आकडेवारीनुसार या बनावट फॉलोअर्सचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे. नरेंद्र मोदी ७० टक्के, केजरीवाल २८ टक्के, शशी थरूर ६३ टक्के, मनमोहनसिग १०, सुषमा स्वराज ५४, ओमर अब्दुल्ला १० टक्के.

लंडनच्या स्टेटस पीपल्स संस्थेने जगभर अशा प्रकारे बनावट फॉलॉअरसंदर्भातले संशोधन व पाहणी केली आहे.

Leave a Comment