दप्तराचे ओझे मुलांना ठरतेय घातक

मुंबई – भारताच्या भविष्याचे शिल्पकार ठरू शकणार्याा शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बँगेच्या ओझ्यामुळे लहान वयातच अनेक शारिरीक व्याधींचा सामना करावा लागत आहे. या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थी पाठदुखी, पाठीच्या कण्यात कायम स्वरूपी बाक येणे अथवा फुफफुसाची कार्यक्षमता कमी होणे अशा अनेक गंभीर व्याधींची शिकार बनत आहेत. आज भारतातील शालेय विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येत सुमारे ३० टक्के विद्यार्थी या व्याधींना बळी पडले असल्याचेही आकडेवारी सांगते.

या क्षेत्रातील तज्ञांच्या मते मुलांच्या वजनाच्या १५ टक्के वजनाचे दप्तर पाठीवर घेतले गेले तर खाद्यांचा आकार बदलतो, मान, पाठीचा कणा व कमरेच्या हाडावर दाब येऊन शरीराचे पोश्चरच बदलते. याच वयात मुलांच्या शरीराची झपाट्याने वाढ होत असताना असा ताण मुलांत कायमची विकृती आणू शकतो असे इंडियन मेडिकल कौन्सिलचे म्हणणे आहे. यामुळे फुफफुसांची कार्यक्षमताही कमी होते असेही डॉक्टर्स सांगतात.

मुलांच्या या दप्तर ओझ्याची तातडीने दखल घेण्याची गरज असून ऊदय फौंडेशनने या संदर्भात ऑनलाईन कॅम्पेन सुरू केले आहे. संस्थेचे संस्थापक राहुल वर्मा सांगतात, ज्ञान मिळविणे हे आनंददायी असले पाहिजे, वेदनादायी नको. या संदर्भात त्यांनी केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाकडेही दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे मात्र त्याला अद्यापी प्रतिसाद आलेला नाही. वर्मा आता या संदर्भात जनहित याचिका दाखल करणार आहेत.

दिल्ली हायकोर्टात या संदर्भात पूर्वीच याचिका दाखल केलेले समाज कार्यकर्ते व वकील अशोक आगरवाल सांगतात न्यायालयाने या संदर्भात कांही मार्गदर्शक तत्त्वे शाळांसाठी जाहीर केली आहेत. त्यानुसार मुलांना होमवर्क देऊ नये व त्याच्या वजनाच्या १० टक्के वजन होईल इतपतच दप्तराचे ओझे असले पाहिजे मात्र कोणत्याच शाळेने त्याची दखल घेतलेली नाही. १९९४ साली प्रो. यशपाल यांच्या समितीनेही या संदर्भात कही शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार पहिली दुसरीतील मुलासाठी २ किलोपेक्षा कमी, ३-४ इयत्तेसाठी ३ किलेापेक्षा कमी, ५ वी ते ८वी ४ किलो व ९वी ते १२वी ६ किलोपेक्षा अधिक वजनाचे दप्तर असू नये. मात्र ही तत्त्वेही कोणत्याही शाळेने स्वीकारलेली नाहीत.

विशेष म्हणजे जगभरात मुले शालेय शिक्षण घेतात पण भारतातच दप्तराचे ओझे हा प्रकार आहे. अनेक देशात शाळेतच लॉकर असतात व मुलांना तेथेच पुस्तके वह्या दिली जातात तर यूएस. ऑस्ट्रेलिया, जर्मनी या सारख्या देशांत ई बुक व ई पॅडसचा वापर केला जातो.

Leave a Comment