माज उतरवण्याची वेळ आली आहे – राज ठाकरे

जालना – ‘ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेचा आणि पैशांचा माज आला आहे. त्यांचा हा माज उतरवण्याची वेळ आता आली आहे. त्यांचे आव्हान मी स्वीकारले असुन येत्या सात मार्चला मी पुण्यामध्ये येतोय , हिंमत असेल तर अडवून दाखवा ‘, अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीला थेट आव्हान देत, राष्ट्रवादीविरुद्ध आघाडी उघडली आहे. जालन्यातील सभेनंतर दोन्ही पक्षातील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे. दुसरीकडे मात्र , या सभेनंतर राज ठाकरे यांनी ‘ पुण्यात येऊनच दाखवा ‘, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दिला आहे . त्यामुळे राष्ट्रवादी – मनसे यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत .

गेल्या काही दिवसापासून मनसे व राष्ट्रवादीत राज्यभरात झालेल्या संघर्षानंतर राज यांच्या जालन्यातील सभेत काय बोलणार याची उत्सुकता होती. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी व विशेषतः अजित पवार यांनाच लक्ष्य केले . त्यासोबतच भाजप – शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची मिलीभगत असल्याचा आरोप करीत काही त्याचे दाखले पण त्यानी दिले. सोबत केंद्रीय मंत्री शरद पवारांनाही राज यांनी लक्ष्य केले आहे.

पुण्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते अंकुश काकडे यांनी राज ठाकरे यांना पुण्यात पाऊल ठेवू देणार नाही , असा इशारा दिला होता . त्याचा समाचार घेताना राज यांनी अडवून दाखवण्याचे आव्हान दिले . ‘ मी बोलतो ती राज्याची भावना आहे . त्यामुळे विरोधक बिथरले आहेत . काळे झेंडे दाखविणार असाल तर त्या झेंड्याचे लाल बावटे करू . जशास तसे उत्तर देऊन बघाच , आमचीही तयारी आहे . दगड आमच्याकडेही आहेत ‘, असा इशारा त्यांनी सभेवेळी दिला आहे.

अजित पवार यांच्या सोबत केंद्रीय मंत्री शरद पवारांनाही राज यांनी लक्ष्य केले.’ दुष्काळामुळे महाराष्ट्रात होणारे आयपीएलचे सामने रद्द करणार का ?’, असा सवाल करून काही प्रश्न विचारले आहेत.

या सभेनंतर राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी राज ठाकरे यांना ‘ पुण्यात येऊनच दाखवा ‘, असा इशारा देत उत्तर दिले . ‘ या प्रकरणाची सुरुवात राज ठाकरे यांनी केली आहे . सातत्याने ते अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत . आज त्यांनी आमचे दैवत असलेल्या शरद पवार यांच्यावरही टीका केली . राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे सहन होणार नाही . त्यामुळे आम्ही पुण्याबाबत दिलेले आव्हान कायम आहे .’ असे काकडे बोलताना म्हणाले.