राज आणि उद्धव यांनी एकत्र काम करावे: नाना

मुंबई: मराठी माणसाच्या भल्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येऊन काम करावे; असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे.

एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाटेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज आणि उद्धव यांनी एकमेकांकडे पाठ न फिरवता एकत्र काम करावे; असे आवाहन त्यांनी केले.

आपण राजकारणात येणार असल्याच्या शक्यतेचा पाटेकर यांनी ठाम इन्कार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी पित्यासमान होते. मात्र त्यांनीही कधी आपल्याला शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची गळ घातली नसल्याचे स्पष्ट करतानाच आपले केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही जवळचे संबध असल्याचे पाटेकर यांनी नमूद केले.

Leave a Comment