इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांची एनआयएकडून चौकशी

हैदराबाद: आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी स्फोट प्रकरणी आज राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इंडियन मुजाहिदीन (आयएम) या संघटनेच्या दोन सदस्यांची चौकशी सुरू केली. या शहरातील दिलसुखनगर भागात २१ फेबु्रवारीला झालेल्या स्फोटांमध्ये १६ जण मृत्युमुखी पडले, तर ११९ जण जखमी झाले.

आयएमचे सदस्य असणार्‍या सैद मकबूल आणि इम्रान खान यांना दिल्ली पोलिसांनी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी अटक केली. अटकेनंतर त्यांना दिल्लीतील तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. हैदराबादमधील स्फोटप्रकरणी आयएमकडे संशयाची सुई वळली आहे. या पार्श्‍वभूमीवर, मकबूल आणि खान यांना हैदराबादला नेऊन अधिक धागेदोरे मिळवण्यासाठी त्यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्यांची कोठडी हवी असल्याची विनंती गुरुवारी एनआयएकडून दिल्लीतील न्यायालयाला करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.

मकबूल आणि खानचा ताबा मिळाल्यानंतर त्यांना येथे आणण्यात आले. या दोघांनी मागील वर्षी जुलैमध्ये हैदराबादच्या दिलसुखनगर भागाची टेहळणी केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या पाकिस्तानात आश्रय घेतलेला आयएमचा संस्थापक रियाझ भटकळ याच्या सूचनेवरून हैदराबादमध्ये स्फोट घडवण्यात आल्याचा संशय आहे.