बलात्कारित युवतीच्या कुटुंबाला सदनिका देण्याचे सोनियांचे आश्वासन

बालिया – नवी दिल्लीत 16 डिसेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत युवतीच्या परिवाराला दिल्लीच्या द्वारका परिसरात एक सदनिका देण्याचा शब्द संयुक्त पुरोगामी आघाडी अध्यक्ष सोनिया गांधींनी दिला आहे. तसेच या परिवारातील एका सदस्याला नोकरीचेही आश्‍वासन त्यांनी दिले असल्याची माहिती या युवतीच्या भावाने दिली.

शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचेसमवेत सोनियांनी या कुटुंबियांची भेट घेतली. या युवतीच्या आईच्या विनंतीवरुन सोनियांनी घर देण्याचे लगोलग मान्य केले. यावेळी किमान एक तास सोनिया आणि राहुल त्यांच्या घरी थांबले होते. सोनियांनी सर्वाधिक वेळ युवतीच्या आईसमवेत व्यतीत केला. त्यावेळी या कमनशिबी मातेला अनेकदा रडूही कोसळले.

सोनियांनी सांगितले की, या घटनेला जबाबदार असणार्‍या पाचही जणांवर आरोप निश्‍चित करण्यात आले असून, त्या सर्वांना सर्वात कडक शिक्षा देण्यात येणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक बारिक-सारिक तपशीलावर आपले लक्ष असल्याचेही सोनियांनी सांगितले.

सोनियांनी या कुटुंबियांची घेतलेली ही चौथी भेट ठरली. याआधी दोनवेळा सोनियांनी रुग्णालयात भेट घेतली होती. त्यानंतर, सिंगापूरातून युवतीचे शव भारतात आणल्यानंतर, मध्यरात्री सोनिया गांधी स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांचेसमवेत विमानतळावर गेल्या होत्या.

Leave a Comment