राजधानीत पुन्हा सामुहिक बलात्कार

नवी दिल्ली: राजधानीत एकिकडे सामुहिक बलात्काराच्या विरोधात संतप्त निदर्शने सुरू असतानाच दुसरीकडे निर्ढावलेल्या नराधमांचा नंगा नाचही सुखनैव सुरू आहे. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दिल्लीत एका ४२ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ही महिला जयपूरची असून दिल्लीला जाण्यासाठी ती गाडीच्या शोधत होती. एका कारचालकाने तिला लिफ़्ट देऊन आपल्या गाडीत बसविले. पुढच्या प्रवासात त्याने आपल्या आणखी दोन मित्रांना गाडीत घेतले. दिल्लीच्या जवळपास या तिघा नराधमांनी या महिलेवर बलात्कार केला आणि तिला कालाकाजी परिसरात फेकून दिले. या महिलेने मानसिक आणि शारीरिक बळ एकवटून पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

धावत्या बसमध्ये २३ वर्षीय युवतीवर झालेल्या पाशवी सामुहिक बलात्काराने केवळ राजधानीच नव्हे तर संपूर्ण देश पेटलेला असताना पुन्हा हा प्रकार घडल आहे. सामुहिक बलात्काराच्या निषेधार्थ देशभरातील नगरीक रस्त्यावर उतरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. देशाचे गृहमंत्री महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना आखण्याच्या प्रयत्नात आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापुढे पुन्हा असा प्रकार घडणार नाही; अशी ग्वाही देत असतानाच हा प्रकार पुन्हा घडला आहे.

Leave a Comment