महाराष्ट्रातही आदिवासी विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

नाशिक: एका आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर सहा जणांनी बलात्कार करूनही आश्रम शाळा व्यवस्थापनाने यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. अखेर विद्यार्थिनीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या प्रकरणाने सारा देश हादरून गेला असतानाच महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्काराचे प्रकरण उघड झाले आहे. आरोपींमध्ये राजकीय पक्षाचा एक पदाधिकारीही सहभागी आहे.

ही विद्यार्थिनी शाळेतून आश्रम शाळेत परत येत असताना दि. २३ डिसेंबर रोजी सहा नराधमांनी तिला अडवून जवळच्या शेतात नेले आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या प्रकाराबद्दल वाच्यता न करण्याबाबत तिला धमकावले. मात्र या विद्यार्थिनीने आश्रमशाळेत परतताच व्यवस्थापनाला या प्रकारची माहिती दिली. मात्र व्यवस्थापनाने याबाबत ना पोलिसांना माहिती दिली ना या विद्यार्थिनीच्या पालकांना. अखेर तिने आपल्या वडिलांशी संपर्क साधून या प्रकारची माहिती दिली. तिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून गुरुवारी पहाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या विद्यार्थिनीला शासकीय रुग्णालयात उपचार अणि तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.